अमरावती: मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचे खळबळजनक प्रकरण काही दिवसांपुर्वी उघडकीस आले होते. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आश्रमशाळेचे निलंबित अधीक्षक आणि सेंट्रल किचनच्या व्यवस्थापकाची ध्वनिफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. विशेष म्हणजे निलंबित अधीक्षक स्वत:ची ओळख पुरवठादार म्हणून सांगत असल्याचे त्यातून निदर्शनास आले आहे. या ध्वनिफितीची चर्चा रंगली आहे.

ध्वनिफितीत नेमके काय?

सेंट्रल किचनचे व्यवस्थापक सचिन सातपुते आणि निलंबित अधीक्षक संदीप गोळे यांच्यातील संभाषण या ध्वनिफितीत ऐकू येत आहे. यामध्ये संदीप गोळे हे व्यवस्थापकाला आश्रमशाळेत भाजीपाला, ब्रेड, बिस्किट, अंडी, केळी, धान्य, किराणा आदी साहित्य पुरवठा करण्याचे कंत्राट देण्याची मागणी करीत आहे. तसेच या कामासाठी माझ्या भावाच्या नावावर पाच ते सहा परवाने असल्याचे संदीप गोळे यांनी त्या व्यवस्थापकाला सांगितले असल्याचे दिसून येते. या ध्वनिफितीची तपासणी करण्यात येत असल्याचे आणि संदीप गोळे यांच्या विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकल्प कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

७० विद्यार्थ्यांना झाली होती विषबाधा

मेळघाटातील टिटंबा येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला होता. या प्रकरणी ‘सेंट्रल किचन’च्या मालकासह सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आश्रमशाळेच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले, तर मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

सेंट्रल किचनच्या मालकाविरुध्द गुन्हा

टिटंबा येथील आश्रमशाळेत टेंभली येथील सेंट्रल किचनमधून शिजवलेल्या अन्नाचा पुरवठा केला जातो. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सेंट्रल किचनचा मालक विजय बोथरे, तेथील प्रतिनिधी सचिन सातपुते, स्वयंपाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह एकूण सहा जणांच्या विरोधात बीएनएस तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले.

प्रकरणाला नवे वळण

या संपूर्ण प्रकरणात आश्रमशाळा अधीक्षकाची भूमिका काय, सेंट्रल किचनमध्ये शिजवण्यात आलेले अन्न इतर आश्रमशाळांमध्ये देखील पुरवण्यात आले, पण त्या ठिकाणी टिटंबा आश्रमशाळेसारखा गंभीर प्रकार आढळून आला नाही, त्याचे कारण काय, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेच्या वेळी आपण सुटीवर होतो, असे निलंबित अधीक्षकांचे म्हणणे आहेत.