अमरावती: मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘भूत’ असल्याच्या अफवेमुळे शेकडो विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी भीतीपोटी शाळा सोडून घर गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या (अंनिस) सदस्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी

डोमा येथील आश्रमशाळेत काही विद्यार्थिनींना त्रास जाणवल्यानंतर शाळेत भूत असल्याची अफवा पसरली. या भीतीपोटी शाळेतील ६०० हून अधिक विद्यार्थी शाळा सोडून आपापल्या घरी निघून गेले. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव (पुणे), रामभाऊ डोंगरे (नागपूर) आणि प्रवीण देशमुख (मुंबई) यांनी मेळघाटातील दुर्गम भागात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन

अंनिसच्या कार्यकर्त्यांनी डोमा, पाच डोंगरी, खडीमल, चुनकडी यांसारख्या विविध गावांमध्ये जाऊन पालकांशी आणि शिक्षण सोडलेल्या विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. पावसाळी वातावरण आणि रस्त्यांची दुरवस्था असतानाही अंनिसचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुलांचे व पालकांचे समुपदेशन करत आहेत.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

शाळेत भूतासारखी कोणतीही अलौकिक शक्ती किंवा प्रकार घडलेला नाही. मुलांच्या मनामध्ये भीती बसल्याने ही अफवा पसरली आहे. आम्ही अंनिसचे कार्यकर्ते स्वतः त्या आश्रमशाळेत रात्री राहिलेले आहोत, असे स्पष्ट करत अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. मुलींचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी त्यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत परतण्याचे आवाहन केले असून, समुपदेशनानंतर अनेक विद्यार्थिनी पुन्हा शाळेत जाण्यास तयार झाल्या आहेत.

मास हिस्टेरियाची शक्यता

डोमा येथील आश्रमशाळेत २६३ मुले आणि ३४५ मुली निवासी शिक्षण घेतात. काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीने अकारण ओरडणे, अचानक रडणे, शांत बसून राहणे आणि मोठ्याने हसणे अशी लक्षणे दाखवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता हीच लक्षणे इतर मुलींमध्येही पसरली. अमरावतीवरून आलेल्या विशेष समुपदेशन पथकाला या वर्तनामागील मूळ शोधण्यात यश आले नाही. हा प्रकार ‘मास हिस्टेरिया’ म्हणजेच तीव्र मानसिक तणावाशी संबंधित असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी एका विद्यार्थिनीचे नातेवाईक तिला थेट वसतिगृहात घेऊन आले आणि तिथे ‘भूमका’ (स्थानिक मांत्रिक/पुजारी) कडून पूजा-अर्चा केली होती.