अमरावती : जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट परिसरातील आदिवासी व ग्रामीण महिलांच्या कौशल्याला आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विकेंद्रित सोलर चरखा समूह कार्यक्रमांतर्गत कस्तुरबा सोलर खादी महिला समितीच्या महिलांनी तयार केलेल्या ‘कुटीर’ ब्रँडच्या साडीने जागतिक स्तरावर आपला प्रभाव पाडला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध आरोग्य व नैसर्गिक जीवनशैली प्रचारक बार्बरा ओ’नील यांनी ही साडी परिधान करून कलाकुसरीचे कौतुक केले आहे.

मुंबईतील कार्यक्रमात केले कौतुक

दिल्ली येथे आयोजित ‘लिव्ह वेल, लिव्ह नॅचुरली’ या कार्यक्रमात बार्बरा ओ’नील यांना ही सोलर चरखा कापडापासून तयार केलेली आकर्षक साडी भेट देण्यात आली होती. या साडीची उत्कृष्ट गुणवत्ता, सौंदर्य आणि अप्रतिम हस्तकला पाहून बार्बरा ओ’नील इतक्या प्रभावित झाल्या की, त्यांनी मुंबई येथील त्यांच्या पुढील मोठ्या कार्यक्रमात हीच साडी परिधान करून उपस्थितांना संबोधित केले.

धारणी तालुक्यात झाली निर्मिती

धारणी तालुक्यातील मांडू येथील महिला कारागिरांनी आपल्या कष्ट, जिद्द आणि कलाकुसरीच्या बळावर तयार केलेल्या या उत्पादनाला मिळालेली ही जागतिक पसंती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत गौरवाचा क्षण ठरली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मेळघाटातील महिलांना केवळ रोजगारच मिळाला नसून, त्या स्वावलंबन आणि सन्मानाने शाश्वत विकासाकडे पाऊल टाकत आहेत.

जागतिक स्तरावर नवी ओळख

अमरावतीचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे म्हणाले की, ‘मेळघाटातून जगभर’ हा प्रवास आता केवळ एक स्वप्न राहिले नसून, ग्रामीण महिलांच्या हातांनी विणलेली ती एक प्रेरणादायी यशोगाथा बनली आहे, ज्यामुळे ‘कुटीर’ ब्रँडला जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे.

बांबूच्या राख्याही पोहचल्या विदेशात

मेळघाटात बांबूपासून तयार होणाऱ्या राख्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या राख्या थेट विदेशातही पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षी अमेरिका, जर्मनी, आयर्लंड इत्यादी देशांमध्ये या राख्या पाठवण्यात आल्या. आतापर्यंत ६० देशांमध्ये या राख्या पोहोचल्या आहेत. दिवंगत सामाजिक कार्यकर्ते सुनील देशपांडे यांनी सुमारे तीस वर्षांपुर्वी संपूर्ण बांबू केंद्राची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी निरूपमा देशपांडे हे कार्य सांभाळत आहेत. मेळघाटातील अनेक गावांमधील आदिवासी महिला राख्या बनविण्याचे काम करतात. आता त्यांना बाराही महिने राख्या बनविण्याचे काम दिले जात आहे.