अमरावती: लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात जायला आवडते. जंगलात फिरायला गेल्यानंतर काहीतरी वेगळा आणि भन्नाट अनुभव घ्यायला आवडतो.जंगलात ट्रेकिंगला जाणे किंवा एखाद्या उंच किल्ल्यावर चढाई करणे अनेकांना आवडते. पण, जंगलातच उंच मचानावर मुक्कामाची सोय झाली, तर हा वेगळाच रोमांचक अनुभव ठरू शकतो. वनविभागाने मेळघाटातील जंगलात ही सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे.

मेळघाटच्या जंगलाचे वैशिष्ट्य काय?

मेळघाट जंगलात वाघांसह अस्वल, सांभर, रानगवा यांसारखे विविध प्रकारचे प्राणी पर्यटकांना अनेकदा दर्शन देतात. सध्या शंभरावर वाघांची संख्या या जंगलात आहे. मेळघाटाचे जंगल विस्तीर्ण आहे. ते दऱ्या-खोऱ्यांचे आहे. झाडांची संख्या जास्त आहे. जंगल दाट आहे. त्यामुळे वाघांचे दर्शन होण्याचे प्रमाण कमी असते. तरीही अलीकडे अनेकदा पर्यटकांना जंगल सफारीदरम्यान वाघोबा दिसतो, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. विविध जैवविविधतेने परिपूर्ण अशा मेळघाटच्या जंगलात विविध प्राण्यांसह दुर्मिळ झाडे, दऱ्या-खोऱ्यांचा संगम आहे. पर्यटकांसाठी जंगल सफारीची सोयही आहे.

मचानावर निवासाची सोय कुठे?

चारही बाजूंनी उंच पर्वतरांगा, खोल दऱ्या आणि घनदाट जंगल. निसर्गरम्य वातावरणात सुरक्षित पण रोमांचक अनुभव पर्यटकांना मिळावा, यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने चिखलदरा नजीक कुंभी बल्डा येथे उंच अशा मचानावर निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा ‘इको-स्टे’ पर्यटकांसाठी नवे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. चिखलदरा रेंजर्स कॉलेजपासून वैराटकडे जाताना कुंभी बल्डा हे ठिकाण आहे.

डोंगरावरच एकूण चार उंच ‘प्लॅटफॉर्म’ उभारण्यात आले आहेत. तेही साधेसुधे नाहीत, तर मजबूत लोखंडी खांबांवर आहेत. त्यावर मजबूत घरासारखी निवासाची व्यवस्था आहे. जमिनीपासून चाळीस मीटर उंचीवर राहण्याची ही सुविधा सुरक्षित आणि दर्जेदार असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पर्यटकांसाठी सुविधा कोणत्या?

या ‘इको-स्टे-मध्ये दोन व्यक्ती सहजपणे राहू शकतील, अशी व्यवस्था आहे. प्रसाधनगृहाची सुविधा त्यात आहे. उंच ठिकाणावरून जंगल न्याहाळण्याची संधी मिळते. मात्र, अंधार पडल्यानंतर पर्यटकांना मचानावरून खाली उतरण्याची परवानगी नाही. घटदाट जंगल, दरीतून वाहणारा गार वारा आणि चंद्रप्रकाशात वन्यजीवांच्या हालचाली टिपण्याचा रोमांचक अनुभव या ठिकाणी मिळू शकतो.

या मचानांना चुर्णी, कुंभी, अमलतास आणि रानजाई अशी वृक्षांची नावे देण्यात आली आहेत. या भागात खासगी वाहनांना प्रवेश नाही. तर ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना वनविभागाच्या वाहनाने ‘इको-स्टे’पर्यंत पोहचवले जाते. ‘मॅजिकल मेळघाट’ या संकेतस्थळावरून बुकिंग करता येऊ शकते.