नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधून पुनर्वसित झालेल्या गावातील तरुणांच्या स्वप्नांनाही आता नवी दिशा दिली जात आहे. सिपना वन्यजीव विभाग आणि दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्वसित गावांतील युवकांसाठी ‘रोअरिंग बियॉन्ड बाउंड्रीज’ या विशेष कार्यशाळेचे सेमाडोह येथे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे, दुर्गम भागातील पुनर्वसित होऊन व्याघ्र प्रकल्पाबाहेर वसलेल्या गावांतील तरुणांसाठी अशा पद्धतीचे मार्गदर्शन प्रथमच उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उपक्रमाचा मुख्य उद्देश आणि मार्गदर्शन
या उपक्रमांतर्गत पीली, बोराट्याखेडा या जंगला बाहेर पुनर्वसित गावांमधील तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या आतील सेमाडोह आणि चौरकुंड परिसरातील सुमारे १२५ महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. व्याघ्र संवर्धनासाठी गाव पुनर्वसन प्रक्रियेतून गेलेल्या या युवकांना करिअरच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्यात स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप आणि तयारीच्या तंत्रांविषयी सखोल मार्गदर्शन केले.
राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य यादव तरटे पाटील यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, स्पर्धा परीक्षा व व्यक्तीमत्व विकास तसेच वन विभागात नोकरीच्या संधी याचे पटवून दिले. सहायक वनसंरक्षक विवेक शिंदे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शुभम पाटील यांनी प्रशासकीय सेवांमधील संधी यावर प्रकाश टाकला. तसेच दिशा फाउंडेशनच्या रवी थोरात व अजय पाटील यांनी प्रत्यक्ष अभ्यासाच्या नियोजनाबाबत आणि परीक्षा तयारी यावर मार्गदर्शन केले.
उपक्रम महत्त्वाचा कारण..
केवळ व्याघ्र संवर्धनच नव्हे, तर जंगलातून विस्थापित झालेल्या कुटुंबांतील तरुणांना रोजगाराच्या आणि व्यावसायिक प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. पहिल्यांदाच मिळालेल्या या संधीमुळे मेळघाटातील ही तरुणाई आता प्रशासकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी आशादायी असून, या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. आतापर्यंत केवळ गावेच पुनर्वसित केली जात होती.
मात्र, हे पुनर्वसन करताना त्या पूनर्वसित गावातील तरुणाईच्या शिक्षणाचा विचार होत नव्हता. केवळ पैसा, शेती, घर याच गोष्टीला पूनर्वसनात प्राधान्य दिले जात होते. त्यामुळे मेळघाटातील हा पूनर्वसित आदिवासी तरुण अजूनही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत नव्हता. तो त्याच जुन्या प्रवाहात अडकलेला होता. मात्र, मेळघाट वनविभाग आणि दिशा फाउंडेशनने त्यांच्यासाठी या पथदर्शी उपक्रमाची पायाभरणी केली. त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळाला. त्यामुळे मेळघाटातील हा तरुण आता प्रशासकीय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करेल.
