नागपूर : घराचे वीजदेयक कमी करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने छतावर सौरप्रकल्प बसवला. पण त्यातून तयार झालेली अतिरिक्त वीज ठरलेल्या मुदतीत वापरता आली नाही, तर पुढील देयकात तिचा लाभ मिळणार का? महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या प्रस्तावित नियमांमुळे विशेषतः तीन किलोवॅटपेक्षा मोठे प्रकल्प उभारणाऱ्या नव्या ग्राहकांसमोर हा प्रश्न उभा राहिला आहे. शिल्लक विजेचा हिशेब, नवे शुल्क आणि मोठ्या प्रकल्पांसाठी बॅटरी साठवणुकीच्या अटी नेमक्या काय आहेत, ते पाहूया.

नियमांत सर्वांत मोठा बदल कोणता?

आयोगाच्या ‘ग्रीडशी जोडलेल्या छतावरील अक्षय ऊर्जा प्रणाली नियमावली, २०२६’च्या मसुद्यानुसार, तीन किलोवॅटपेक्षा मोठ्या प्रकल्पांतील अतिरिक्त विजेचा हिशेब वर्षाऐवजी दरमहा होईल. महिनाअखेरीस न वापरलेली वीज पुढील देयकात वापरण्यासाठी नोंदवता येणार नाही, अशी तरतूद प्रस्तावित आहे. त्यामुळे अतिरिक्त वीज निर्माण करणाऱ्या ग्राहकांचा लाभ कमी होण्याची शक्यता आहे.

तीन किलोवॅटपर्यंतच्या प्रकल्पांचे काय?

या प्रकल्पांतील अतिरिक्त विजेचा हिशेब वर्षाअखेरीस होईल. तेव्हा शिल्लक राहिलेली वीज वितरण कंपनी खरेदी करेल. तिचा दर सौरवीज निर्मितीच्या वेळेतील बाजारभावाच्या आधारे आयोग दरवर्षी जाहीर करेल.

अतिरिक्त विजेवर शुल्कही भरावे लागेल का?

ग्राहकाची एकत्रित करारबद्ध ऊर्जा क्षमता दहा किलोवॅटपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त वीज पुढील वापरासाठी नोंदवण्यावर मासिक स्थिर शुल्क प्रस्तावित आहे. एका कालखंडातील वीज दुसऱ्या कालखंडात वापरल्यास विजेच्या प्रमाणानुसार आणखी शुल्क लागू होईल. या शुल्कांचे दर अद्याप ठरलेले नाहीत.

बॅटरी साठवणुकीची अट कोणासाठी आहे?

मसुद्यात १०० किलोवॅटपेक्षा मोठ्या प्रकल्पांसाठी बॅटरी साठवणूक यंत्रणा प्रस्तावित आहे. प्रकल्पाच्या ५० टक्के क्षमतेइतकी दोन तास किंवा २५ टक्के क्षमतेइतकी चार तास साठवणूक अपेक्षित आहे. नेमक्या १०० किलोवॅटच्या प्रकल्पाला ही अट लागू होईल का, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे.

गृहनिर्माण संस्थांना एकत्र प्रकल्प उभारता येईल का?

एकत्र येऊन अन्य ठिकाणी प्रकल्प उभारण्याचा पर्याय मसुद्यात आहे; मात्र अशा प्रकल्पाची किमान क्षमता १०० किलोवॅट असावी लागेल. सहभागी ग्राहक एकाच वितरण कंपनीच्या क्षेत्रातील आणि एकाच प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. लाभ मोजताना वहन शुल्क आणि वीजहानीही विचारात घेतली जाईल.

जुन्या सौरग्राहकांवर काय परिणाम होईल?

विद्यमान करार मुदतीपर्यंत सुरक्षित राहतील. मात्र प्रकल्पाची क्षमता किंवा रचना बदलल्यास, अथवा विजेच्या मोजणीची पद्धत बदलल्यास नवे नियम लागू होतील. वीजतज्ज्ञ सुधीर बुधे यांनी जुन्या प्रकल्पांचे लाभ सुरक्षित ठेवून नवे नियम केवळ वाढीव क्षमतेला लागू करण्याची मागणी केली आहे. शुल्क आणि साठवणुकीच्या सक्तीचाही फेरविचार व्हावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

ग्राहकांना आपले म्हणणे कधीपर्यंत मांडता येईल?

मसुद्यावर १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत हरकती नोंदवता येतील. मुंबईतील वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांच्या मते, प्रस्तावित तरतुदींमुळे नव्या सौरग्राहकांना मिळणारा लाभ कमी होऊ शकतो आणि प्रकल्प उभारण्याच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. आयोगाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच नियमांचे निश्चित स्वरूप स्पष्ट होईल.