अमरावती : सिंह तारका समूहातून १७ ते २० नोव्हेंबर या काळात मोठ्या प्रमाणात उल्का वर्षात होणार आहे. या उल्का वर्षावाचे ‘लिओनिड्स’ हे नाव आहे. यादरम्यान पहाटे उल्का वर्षावाची शक्यता जास्त राहील.

उल्का वर्षावाची तीव्रता, निश्चित तारीख व वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नसली तरी तो साध्या डोळ्यांनी आपल्याला मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवरून किंवा शहराबाहेर जाऊन अंधारातून पाहता येईल. खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृश्य अवश्य बघावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले.

काय आहे उल्का वर्षाव ?

धुमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असताना त्यातील काही भाग मोकळा होतो, हे धुमकेतूने मागे टाकलेले अवशेष होय. या उल्का एखाद्या तारका समूहातून येत आहे असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखाद्या भागातून पडत असतील तर त्यास ‘उल्का वर्षाव’ असे म्हणतात.

धूमकेतूंच्या अवशेषांमुळे उल्कावर्षाव

उल्कापाताबाबत लोकांच्या अंधश्रद्धा खूप आहेत; परंतु अशा अंधश्रद्धेला खगोलशास्त्रात कोठेही आधार नाही. सिंह तारका समूहातून होणारा हा उल्का वर्षाव ‘टेम्पलटटल’ या धुमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धुमकेतू ३३ वर्षानी सूर्याला भेट देतो, अशी माहिती खगोल अभ्यासकांनी दिली.
उल्का म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणारा अंतराळ खडक किंवा उल्कापिंड. अंतराळातील खडक पृथ्वीच्या दिशेने पडत असताना त्या खडकावरील हवेचा प्रतिकार किंवा ओढ यामुळे तो अत्यंत उष्ण होतो. आपण पाहतो तो म्हणजे ‘शूटिंग स्टार’. ती चमकदार रेषा म्हणजे खरंतर खडक नव्हे, तर उष्ण खडक वातावरणात फिरत असताना चमकणारी गरम हवा आहे. जेव्हा पृथ्वीला एकाच वेळी अनेक उल्कापिंडांचा सामना करावा लागतो, तेव्हा आपण त्याला उल्कावर्षाव म्हणतो.

उल्कावर्षावाची वेळ आल्यास तुम्हाला दुर्बिणी किंवा उंच डोंगराची आवश्यकता भासणार नाही. मध्यरात्री तुम्हाला उठवण्यासाठी तुमच्या उबदार स्लीपिंग बॅग आणि अलार्म घड्याळाची आवश्यकता असू शकते. परंतु मग फक्त तुमच्या स्वत:च्या घराच्या छतावर झोपणे तुम्हाला एका उत्कृष्ट ‘शो’चा आनंद घेण्यासाठी योग्य ठिकाणी असेल.

उल्कावर्षाव पाहण्यासाठी सहनशीलतेची गरज असते. यासाठी कृत्रिम प्रकाशापासून दूर आणि उंच ठिकाण निवडल्यास उत्तम, जेणेकरून स्वच्छ आणि संपूर्ण आकाश दिसेल. तसेच एखाद्या उंच इमारतीच्या छतावरून निरीक्षण करता येईल.