चार शहरांचे प्रस्ताव केंद्राकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक आणि ठाणे या चार शहरांतील मेट्रो विस्ताराचे प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्यात आले असून पुढील पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

केंद्रीय शहर विकास मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार देशातील विविध राज्यांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाच्या २०१७ च्या मेट्रो रेल्वे धोरणानुसार राज्य शासनाकडून प्रस्ताव आल्यावर केंद्र शासन प्रस्तावाची व्यवहार्यता लक्षात घेऊन त्याला मंजुरी प्रदान करते. देशातील आठ राज्यांतून एकूण १५ प्रस्ताव केंद्राकडे आले असून त्यात महाराष्ट्रातील नागपूर व पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा-२ चा, नाशिकमधील नियोमेट्रोचा आणि ठाण्यातील रिंग मेट्रोचा अशा एकूण चार प्रस्तावांचा समावेश आहे. पुढील पाच वर्षांत या चारही शहरातील विस्तारित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

नागपूरमध्ये पहिल्या टप्प्याचे काम ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून दोन मार्गिकांवर सध्या मेट्रोची सेवा सुरू झाली आहे. पुण्याचे पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाशिकचा ३ किमीचा प्रस्ताव, पुणे (दुसरा टप्पा) ४.४१ किमी. ठाण्याचा २८.८०  कि.मी.चा आहे. नियोजनानुसार पुढील पाच वर्षांत विस्तारित काम पूर्ण झाल्यास राज्यात मेट्रोचे जाळे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान नाशिक, नागपूर, पुणे मेट्रो विस्ताराचे काम महामेट्रोकडेच असून ठाण्याचा प्रकल्प अहवालही महामेट्रोने करून दिला आहे. पुढच्या टप्प्यात औरंगाबादमध्येही मेट्रो सुरू होणार असून त्याचा प्रकल्प अहवालही महामेट्रोच तयार करणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro expansion proposals in four cities submitted to the center union ministry of urban development akp
First published on: 24-01-2022 at 00:18 IST