लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : नागपूरच्या क्रिकेट चाहत्यांसाठी नागपूर मेट्रो ६ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजेपर्यंत धावणार आहे. ऐरवी मेट्रोसेवा सकाळी ६ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहते. क्रिकेट सामन्याच्या निमित्ताने ती रात्री ११:३० पर्यंत सुरू राहणार, असे महामेट्रोकडून कळवण्यात आले आहे.

विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात ६ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी एकदिवसीय डे-नाईट क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. नागपूरकरांना हा सामना पाहण्यासाठी मेट्रोने न्यू एअरपोर्ट, खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत सर्व मेट्रो स्टेशन्सवरून मेट्रोसेवा उपलब्ध असेल. शेवटची ट्रेन खापरी मेट्रो स्टेशनवरून ११.३० वाजता सुटेल. खापरीहून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपर्यंत प्रवास करू शकतील किंवा सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलून अ‍ॅक्वा लाईनच्या कोणत्याही दिशेने प्रवास करू शकतील. मेट्रो ट्रेन्स दार १० मिनिटांच्या अंतराने दिवसभर धावतील. जामठा स्टेडियम न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ७ किलोमीटर आणि खापरी मेट्रो स्टेशनपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. जामठा स्टेडियम आणि परत येण्यासाठी न्यू एअरपोर्ट स्टेशनवर एनएमसी बसेस उपलब्ध असतील (पेमेंट आधारित).

क्रिकेट चाहत्यांना मॅचनंतर ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी महा मेट्रोच्या सेवांचा वापर करून आपल्या घरी पोहोचण्याची सुविधा मिळेल. महामेट्रो नागपूरच्या क्रिकेट प्रेमी नागरिकांना रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी मेट्रो वापरण्याचे आवाहन करत आहे.

जामठा मैदान वर्धामार्गावर असून तेथे जाण्यासाठी सामन्याच्या दिवशी वाहनांची मोठी गर्दी होते. सामन्यांची सर्व तिकीट संपल्या आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या क्रिकेट रसिकांची गर्दी दुपारपासूनच सुरू होणार आहे. सामना संपल्यावर एकाच वेळी लाखो प्रेक्षक मैदानाबाहेर पडत असून ते शहराच्या दिशेने निघतात. त्यामुळे रस्त्यावर एकच ग र्दी होते. यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजन केले असले तरी चारचाकी वाहनांमुळे सामन्याच्या दिवशी कोंडी होते. ती टाळण्यासाठी मेट्रो हा उत्तम पर्याय आहे.

खापरीपर्यंत मेट्रोची सेवा असून तेथून सामनास्थळापर्यत बसेसची व्यवस्था आहे. मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊ शकते. त्यामुळे क्रिकेट रसिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोने प्रवास करावा,असे आवाहन महामेट्रोने केले आहे. महापालिकेनेही शहराच्या विविध भागातून विशेष बसची व्यवस्था केली आहे. सामन्याच्या दिवशी वर्धामार्गावरील जड वाहनांची वाहतूक वळवण्यात आलीआहे. भंडारा, जबलपूर या मागाने येणारे व वर्धामार्गाकडे जाणारी वाहतूकही वळवण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro service for cricket fans in nagpur till 11 30 pm on 6th february cwb 76 mrj