बुलढाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कडव्या विरोधानंतरही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना (मनरेगा – MGNREGA)चे लवकरच ‘विबी-जी राम जी’ (VB-G RAM G) म्हणजेच विकसित भारत – गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) – Viksit Bharat-Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) असे नामांतर होणार आहे. त्यापूर्वी या योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे.
KYC प्रक्रिया पूर्ण
कामावरील लाखो मजुरांची ओळख सक्रिय मजुराच्या चेहऱ्याच्या प्रमाणिकरण (फेस ऑथॉँटिकेशन – Face Authentication )द्वारे पटवून हजेरी लावण्यात येत आहे. त्यापूर्वी मनरेगातर्फे मजुरांसाठी केवायसी-KYC प्रक्रिया राबविण्यात आली. मनरेगा योजनेत नजीकच्या काळात अनेक बदल दिसून येणार आहे.
१ एप्रिलपासून नवे नाव
योजनेचे नामकरण ‘विबी-जी राम जी’ (VB-G RAM G) असे होणार आहे. १ एप्रिलपासून हे नामकरण होण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वी मजुरांची केवायसी आणि चेहऱ्याचे प्रामाणिकरणद्वारे ओळख पटविण्याचा आणि हजेरी नोंदवण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात केवायसी-KYC आणि चेहऱ्याद्वारे मजुराची ओळख, हजेरीचा पथदर्शी प्रकल्प ( पायलट प्रोजेक्ट – Pilot Project) राबविण्यात आला. मागील ११ फेब्रुवारी २०२६ पासून राबविण्यात आलेला ( यवतमाळमधील ) हा प्रकल्प यशस्वी ठरला. मजुरांचे ई केवायसी-KYC करून त्यांच्या जॉब कार्डचे (Job Card) प्रमाणिकरण, नूतनिकरण करण्यात आले.
यवतमाळनंतर आता संपूर्ण राज्यात…
यवतमाळपाठोपाठ आता हा प्रयोग संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात सक्रिय मजुरांची केवायसी-KYC करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ९१ लाख ८६ हजार २६४ पैकी ७० लाख ८१ हजार २७६ सक्रिय मजुरांची केवायसी-KYC करण्यात आली आहे. याची टक्केवारी ७७ टक्के इतकी आहे.
NMMS App द्वारे हजेरी
यापाठोपाठ २ मार्च २०२६ पासून मनरेगा कामावरील मजुराची वैयक्तिक ओळख चेहऱ्याच्या मदतीने पटविण्यात येत असून याद्वारे दैनिक हजेरी लावण्यात येत आहे. पूर्वी मजुरांच्या सामूहिक छायाचित्रद्वारे ही ओळख पटविण्यात येऊन हजेरीची नोंद करण्यात येत होती. मात्र आता एकेका मजुराची चेहऱ्याद्वारे ओळख पटवून हजेरी लावण्यात येत आहे. यासाठी ‘एनएमएमएस ॲप'(NMMS App) विकसित करण्यात आले आहे.
मजूर कामावर आला की रोजगार सेवकच्या मदतीने चेहऱ्याच्या मदतीने हजेरी लावण्यात येत आहे. कामावर आलेल्या सर्व मजुरांची याच पद्धतीने हजेरी लावण्यात येत आहे.
