चंद्रशेखर बोबडे
नागपूर : मनरेगाच्या कामांवरील अकुशल कामगारांच्या मजुरीचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात हे दर प्रतिदवस २५८ रुपये असून हरियाणासह इतर पाच राज्यात ते यापेक्षा अधिक आहेत. तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार राज्यातील दर महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) ही मागणीवर आधारित रोजगार देणारी योजना असून याद्वारे देशाच्या ग्रामीण भागातील कुटुंबांना एक वर्षांत किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. कुशल व अकुशल अशा दोन प्रकारची कामे यात समाविष्ट असतात. सामान्यत: प्रौढ नागिरकांना अकुशल काम दिले जाते. या कामगारांच्या मजुरीचे दर केंद्रीय ग्रामीण विकास खाते मनरेगा कायदा २००५ च्या कलम ६ (१) नुसार प्रत्येक राज्यासाठी निश्चित करते व त्यात महागाई, ग्राहक किंमत निर्देशांकातील बदल या आधारावर दरवर्षी सुधारणा केली जाते. केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या २०२१ च्या प्रत्येक राज्यातील अकुशल कामगारांच्या मजुरी दर सूचीवर नजर टाकल्यास प्रत्येक राज्यात ते वेगवेगळे असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात २०२०-२१ मध्ये अकुशल कामगारांचे मजुरी दर प्रतिदिवस २३८ रु. होते. त्यापेक्षा शेजारच्या मध्यप्रदेशात (१९० रु.), छत्तीसगड (१९० रु.), बिहार (१९४ रु.) आणि आसाम (२१३ रु.) या राज्यात कमी दर होते तर हरियाणा (३०९ रु.), कर्नाटक (२७५ रु.), केरळ (२९१ रु.), पंजाब (२६३ रु.) आणि राजस्थान (२५६ रु.) होते. मजुरीच्या दरात समानता असावी, अशी कामगारांची मागणी आहे. विदर्भात मोठय़ा संख्येने मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील मजूर कामांसाठी येतात. या दोन्ही राज्यातील दराच्या तुलनेत महाराष्ट्रात दर अधिक आहे.
केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दर राज्य सरकारला देण्याची मुभा आहे, असे केंद्रीय ग्राम विकास विभागाकडून सांगण्यात आले.
राज्यनिहाय मजुरीचे दर
महाराष्ट्र- २३८ रु., मध्यप्रदेश १९० रु., आंध्रप्रदेश- २३७ रु., आसाम – २१३ रु., बिहार – १९४ रु. , छत्तीसगड १९० रु., गुजरात २२४ रु., हरियाणा- ३०९ रु., कर्नाटक २७५ रु., केरळ – २९१ रु., पंजाब- २६३ रु., तामिळनाडू – २५६ रु., राजस्थान २२० रु.