वर्धा : मध्य पूर्वेतील तणाव वाढून अखेर युद्ध सूरू झाले आहे. अमेरिका व इस्त्राईलने इराणविरोधात संयुक्त मोहीम हाती घेत त्या देशावर जोरदार हल्ले सूरू केले. इराणच्या धार्मिक, राजकीय व लष्करी नेतृत्वास या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. मात्र इराणने पण तोडीस तोड प्रतिकार करणे सूरू केले आहे. इस्त्रायलसह कतार, कुवेत, बहरिन, संयुक्त अरब अमीरती येथील अमेरिकी लष्करी तळावर प्रतिहल्ले करून संघर्षाची व्याप्ती गडद केली आहे.
या पार्श्वभूमीवर या विविध देशात असलेल्या भारतीयांबद्दल चिंता व्यक्त होत आहे. म्हणून केंद्र व महाराष्ट्र शासन यांनी सुरक्षा इशारे दिले आहे. संबंधित देशातील भारतीय दुतावासने तेथील भारतीय नागरिकांना काही काळजी घेण्यास सुचविले आहे. प्रामुख्याने पॅलेस्टीन ( रामल्ला ), कतार, सौदी अरेबिया, इस्त्रायल, इराण, इराक, कुवेत, बहरीण मस्कत, जोर्डन आणि अबुधाबी येथे भारतीय वास्तव्यास आहेत. नागरिकांनी सतर्क रहावे व अनावश्यक हालचाली टाळाव्या, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नोंद असलेल्या नागरिकांना इशारे पोहचले. पण या काळात तिथे काही भारतीय पर्यटक म्हणून पण गेले आहेत. त्यांची माहिती घेणे सूरू असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले आहे. अद्याप वर्धा जिल्ह्यातील तिथे असलेल्या पर्यटकांची अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. संबंधित देशातील भारतीय दुतावासचे फोन क्रमांक तसेच ईमेल प्रसिद्ध करण्यात आले आहे. गरज वाटल्यास वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी ०७१५२ – २३२५२० या क्रमांकावर संपर्क करण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, सीबीएसई या परीक्षा मंडळाने युद्धाच्या हालचाली पाहून दहावी व बारावीच्या स्थगित केल्या आहेत. मध्य पूर्व देशात या मंडळाच्या मान्यता असलेल्या शाळा काही भागात चालविल्या जातात. २ मार्च पासून त्यास सुरवात होणार होती. दहावी व बारावीच्या या संभाव्य परीक्षा बहरीण, कुवेत, इराण, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई या देशात होणार होत्या. या परीक्षा बाबत पुढील स्थिती पाहून निर्णय होणार आहे. ५ मार्च पासून तेथील परिस्थितीचा आढावा परीक्षा संदर्भात घेतल्या जाणार आहे.
या युद्धाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थ व्यवस्थेवर होण्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. भारतातील विविध राज्यातील व प्रामुख्याने केरळम या राज्यातील नागरिक मध्य पूर्व देशात रोजगारासाठी गेलेले आहेत. त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्या जात असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले.
