लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : मिहान पुनर्वसन अंतर्गत कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही सुरुवातीपासूनच घेतली आहे. खापरी रेल्वे पुनर्वसन प्रकल्पात उभारण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील शंभरटक्के दुकाने व गाळे स्थानिकांना आवंटित करण्यासाठी पायाभूत रक्कमेवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात प्राधान्य देण्यात येईल, असे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. याचबरोबर कलकुही, तेल्हारा, दहेगाव, खापरी येथील घरांची प्रलंबित प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ मार्गी लावली जातील अशी हमी त्यांनी दिल्यानंतर मिहान प्रकल्पग्रस्तांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे मान्य केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. विपीन इटनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मिहान प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाशी समन्वय साधणे सोपे जावे यदृष्टीने निवडक गावकऱ्यांचा सहभाग असलेली एक व्यापक कृती समिती या बैठकीत निश्चित करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासमवेत ही समिती समन्वय ठेवून अपेक्षित कामांना सहकार्य करेल, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. “मी स्वत: या पुनर्वसन प्रकल्पावर लक्ष ठेवत असून शासनस्तरावर ज्या काही इतर लहान-मोठ्या बाबी शिल्लक आहेत त्याही तत्काळ मार्गी लावीन असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mihan project victims will get place in commercial complexes revenue minister chandrashekhar bawankules solution cwb 76 mrj