रोज लक्षावधी लिटर पाण्याची बचत होणार; एक चारचाकी धुण्यासाठी केवळ १०० एमएल सोल्युशन

वाहने धुण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते. मात्र आता पाण्याचा एकही थेंब न वापरता वाहने धुणे शक्य झाले आहे. नागपुरात गो वॉटरलेस संकल्पना आली असून त्या माध्यमातून पाण्याचा वापर न करता वाहने चकाचक करता येणार आहेत. या संकल्पनेमुळे वाहने स्वच्छ होतीलच त्यासोबतच पाण्याची बचतही होणार आहे.

प्रत्येकाला वाटत असते की आपले वाहन नेहमी नवीन दिसावे. त्यासाठी नागपूरकर दररोज वाहनावर पाण्याचा मारा करतात. काही जण पाईपने तर काही जण दोन-तीन बादल्या पाणी घेऊन वाहन धुतात. एक वाहन धुण्यास जवळपास दोन बादल्या पाणी लागते. म्हणजे ४० लिटर. पाईपने धुतल्यास ७० लिटर आणि सव्‍‌र्हिसिंग सेंटरवर जवळपास २०० लिटर पाणी लागते. दररोज शहरात लाखो चारचाकी, दुचाकी, बस, ट्रक अशी वाहने धुण्यात येतात. त्यामुळे कोटय़वधी लिटरचे पाणी दररोज वाया जाते. नुकताच नीती आयोगाचा २०१९-२०चा पाण्यासंदर्भातील अहवाल समोर आला. अहवालात देशात केवळ चार टक्के गोड पाणी शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय पाण्याची बचत न केल्यास २०४० मध्ये देशाला पाण्यासाठी न भुतो व भविष्यती अशा समस्येला सामोरे जावे लागणार असून भविष्यात ९० टक्के नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी वापरणे  आवश्यक आहे. मात्र दुसरीकडे वाहने धुण्यासाठी  कोटी लिटर पाणी वाया जात आहे. हे सर्व लक्षात घेता गो वॉटरलेस तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून यामध्ये एकही थेंब पाण्याचा वापर केला जात नाही. शिवाय तुमचे वाहन पूर्वीपेक्षा अधिक चकाचक दिसते.

पाण्याने वाहन धुताना त्यावर असलेली धूळ ओल्या कपडय़ाने पुसण्यात येते. मात्र यावेळी धुळीतील कणांमुळे  वाहनावर रेघा पाडतात. मात्र गो वॉटरलेस तंत्रज्ञानात पाण्याऐवजी एक वॅक्सयुक्त सोल्युशन फवारण्यात येते. हे सोल्युशन वाहनावरील धूळ अलगद हटवते. त्यानंतर सोल्युशनला एका विशेष कापडाने हलक्या हाताने पुसण्यात येते.

सोल्युशनमध्ये वॅक्स असल्याने वाहनावरची धूळ अलगद वर येऊन विशेष कापडावर चिटकते. त्यानंतर दुसऱ्या कपडय़ाने ती पुसण्यात येते.धुळ निघाल्यामुळे वाहनावर ओरखडे पडत नाही. एक चारचाकी धुण्यासाठी केवळ शंभर एमएल सोल्युशन लागते. यामुळे खर्चातही बचत होते.

भविष्यात पाणी शिल्लक राहण्यासाठी आम्ही पाणी न वापरता वाहने धुण्याची संकल्पना घेऊन आलो आहोत. विदेशात याच संकल्पनेने वाहने चकाचक केली जात आहेत. हे सोल्युशन ब्राझिलहून बोलवण्यात येत असून ते अगदी माफक दरात मिळते. आम्ही नागरिकांना विनंती करतो की वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर करू नये. – नितीन शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, गो वॉटरलेस.