नागपूर : गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या आणि शासकीय रुग्णालयात जीवनरक्षण प्रणालीवर उपचार घेत असलेल्या १४ वर्षीय मुलीला भेटण्यासाठी गेलेल्या राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. बालरोग अतिदक्षता विभागात गेलेल्या जयस्वाल यांनी यावेळी मुखपट्टी, हातमोजे किंवा अन्य संरक्षण साधनांचा वापर केला नाही. त्यांनी तेथूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘व्हिडीओ कॉल’ करून जीवनरक्षण प्रणालीवरील मुलीला दाखवले.

या भेटीचा व्हिडीओ जयस्वाल यांनी फेसबुकवर सार्वजनिक केल्यावर हा प्रकार उघड झाला. मात्र यामुळे आपण अडचणीत येऊ हे लक्षात आल्यावर त्यांनी व्हिडीओ काढून घेतला. मात्र यासंदर्भातील त्यांची पोस्ट कायम आहे.

गडचिरोलीतील सर्पदंशाच्या घटनेत तीन मुलींचा मृत्यू, तर तीन मुलींची प्रकृती बिघडली होती. त्यापैकी एकीची प्रकृती खालावल्याने तिला नागपुरात आणण्यात आले होते. ती बरी होऊन घरी परतली. दरम्यान, गडचिरोलीत उपचार सुरू असलेल्या अन्य एका मुलीची प्रकृती खालावल्याने तिलाही मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या मेंदूतील नस फाटून रक्तस्राव झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ती अतिदक्षता विभागात जीवनरक्षण प्रणालीवर आहे. १५ ऑगस्टला राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी अतिदक्षता विभागाला भेट देऊन मुलीच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी थेट तेथूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडीओ कॉल केला आणि त्यांना गंभीर अवस्थेत असलेल्या मुलीला दाखवले. रुग्णशय्येच्या बाजूला उभे राहून तिच्या पालकांशीही शिंदे यांच्याशी संवाद साधून देण्यात आला. यावेळी मंत्र्यांबरोबर स्वीय सहाय्यक आणि चित्रीकरण करणारी आणखी एक व्यक्ती होती.

अतिदक्षता विभागात प्रवेश करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. खुद्द डॉक्टर याचे पालन करतात. मात्र मंत्र्यांसह त्यांच्याबरोबर असलेल्यांनी साधी मुखपट्टी किंवा हातमोजे घातलेले नव्हते. दरम्यान, यावेळी अतिदक्षता विभागात अन्य गंभीर बालरुग्णांवरही उपचार सुरू होते. त्यामुळे बाहेरील व्यक्तींचा प्रवेश, वावर आणि चित्रीकरणामुळे संसर्ग नियंत्रणाच्या नियमांचे पालन झाले का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

केंद्र सरकारच्या संसर्ग प्रतिबंध मार्गदर्शक तत्त्वांनुसार दूषित हात, कपडे, उपकरणे आणि पृष्ठभागांमधून रुग्णालयीन संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे हातांची स्वच्छता, योग्य संरक्षण साधनांचा वापर आणि आवश्यकतेनुसार प्रवेश नियंत्रण महत्त्वाचे आहे. रुग्णाच्या जवळ जाताना मुखपट्टी वापरण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अतिदक्षता विभागातील या भेटीची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात ‘मेडिकल’चे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याशी व्हॉट्सॲप व लघु संदेशाद्वारे संपर्क साधून बाजू विचारली; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. बालरोग विभागातील एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर मंत्र्यांनी रुग्णापासून लांब राहून व्हिडीओ कॉल केल्याचा दावा केला.

राज्यमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही

राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांच्याशी भ्रमणध्वनी, व्हॉट्सॲप व लघु संदेशाद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, जयस्वाल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये या भेटीविषयी पोस्ट केली आहे. त्यानुसार १५ ऑगस्टला मेडिकलमध्ये भेट घेऊन रुग्ण मुलीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ‘व्हिडीओ कॉल’द्वारे संपर्क साधून त्यांना मुलीच्या प्रकृतीची माहिती दिली तसेच कुटुंबीयांशी संवाद साधून धीर दिल्याचेही त्यांनी नमूद केले. उपचारात कमतरता भासू न देण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे, तसेच आपणही कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे जयस्वाल यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

अतिदक्षता विभागातील रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे रुग्णाला भेटण्यासाठी जाणार्‍या नातेवाईकांसह कोणत्याही व्यक्तीने मुखपट्टी, डोक्यावरची टोपी आणि आवश्यक त्या ठिकाणी अन्य संरक्षणाची काळजी घ्यावी. यामुळे रुग्णाला संभाव्य संसर्गापासून वाचवता येते.- डॉ. आशिष गांजरे, अध्यक्ष, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीन, नागपूर शाखा