राज्‍य मंत्रिमंडळाच्‍या विस्‍तारात अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू यांना नक्‍कीच संधी मिळेल, हा त्यांच्या समर्थकांचा दावा फोल ठरला आहे. यामुळे त्‍यांच्‍या समर्थकांमध्‍ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभमीवर बच्‍चू कडू यांनी मंत्रिमंडळात आपले नाव असले तरी चांगले आणि नसले तरी चांगले. पण, मंत्रिपद आमचा हक्‍क आहे, तो आम्‍ही मिळवणारच, अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली आहे.

उद्धव ठाकरे सरकारमध्‍ये राज्‍यमंत्री राहिलेले कडू हे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या गटात सहभागी झाले, तेव्‍हा त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांनीही आश्‍चर्य व्‍यक्‍त केले होते. कडू हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या निकटचे मानले जात होते. पण त्‍यांनी शिंदे यांच्‍या बंडाला साथ दिली आणि कायम सत्‍तेत राहण्‍याचा हेतू उघड केला. कडू यांच्‍या प्रहार पक्षाने शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. कडू यांच्‍यासह प्रहारचे दोन आमदार शिंदे यांच्‍या बाजूने आहेत.

मंत्रिपद मिळाले नसल्‍यामुळे आपण नाराज नाही. माझे नाव असले तरी चांगले आणि नसले, तरी चांगले, असे कडू म्‍हणाले. मंत्रिपदापेक्षा शेतक-यांचे मुद्दे आपल्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. त्‍यांचे प्रश्‍न सोडवणे हा आपला प्राधान्‍यक्रम आहे. अपंग, वृद्धांचे अनेक विषय प्रलंबित आहेत, ते मार्गी लावणे आवश्‍यक आहे. अपक्ष आणि प्रहारचे या सरकारमध्‍ये महत्त्वाचे स्‍थान आहे. त्‍याशिवाय सरकार होऊ शकत नाही. आपण मुख्‍यमंत्री शिंदे यांची प्रत्‍यक्ष भेट घेणार असून मंत्रिपद आमचा हक्‍क आहे, तो आम्‍ही मिळवणारच. सरकार हे मित्रपक्ष, अपक्षांशिवाय राहू शकत नाही, असे बच्‍चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.