यवतमाळ : कळंब तालुक्यात दोन भामट्यांनी आर्थिक विवंचनेत असलेल्या महिलेला हेरून तिला पैशांच्या बदल्यात अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यास भाग पाडले. या मुलीचा अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकाशी विवाह लावून देण्यात आला. मात्र तिथे पतीसह सासरा आणि दिरानेच या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पती, सासरा, दिररासह लग्न लावून देणाऱ्या दोन व्यक्तींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर, मुलीच्या आईविरूद्ध अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

पैशांच्या मोहात मुलीचा सौदा

गरिबी आणि अशिक्षितपणाचा फायदा घेत दलालांमार्फत अल्पवयीन मुलीचा सौदा करून तिला लग्नाच्या नावाखाली विकण्यात आल्याचा हा प्रकार असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट झाले. पती, सासरा आणि दिराने दीड महिना तिला कोंडून ठेवत अत्याचार केला. पीडित मुलगी कळंब तालुक्यातील असून शेतमजुरीसाठी राळेगाव तालुक्यातील एका गावात जात होती.

याच दरम्यान चंदा नामक महिलेने मध्यस्थी करत तासलोट (ता. कळंब) येथील सुखदेव देवतळे व जोडमोहा येथील एका इसमाला मुलीच्या आईकडे पाठविले. लग्नाला खर्च नाही, पैसे मिळतील, मुलगी सुखात राहील, असे आमिष दाखवून दलालांनी आईची दिशाभूल केली. मुलीचा संसार सुखाचा होईल, या आशेवर आईने साडेसतरा वर्षांच्या मुलीचे लग्न लावून दिले. मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत बेळगाव घुमरी (जि. अहिल्यानगर) येथील एका शेतातील गोठ्यात पीडितेचे लग्न गणेश बबन गाडे याच्याशी लावण्यात आले.

पतीसह सासरा आणि दिराकडूनही शोषण

सासरी गेल्यानंतर मुलीवर पती गणेश गाडे, सासरा बबन गाडे व दीर पिनू गुरुजी यांनी संगनमताने अत्याचार सुरू केले. पळून जाण्याचा प्रयत्न करताच तिला घरात कोंडून ठेवण्यात आले. दीड ते दोन महिने तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. छळ असह्य झाल्यावर पीडितेने लपून आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मला इथून जाऊ द्या नाही तर मी फाशी घेईन, असे तिने पती गणेशाला सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या आरोपींनीच तिला यवतमाळला जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिले.

उपचारानंतर दिली थेट तक्रार

मुलगी यवतमाळात आल्यानंतर तिला वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतर वडगाव जंगल पोलिसांनी पती गणेश बबन गाडे, सासरा बबन गाडे, दीर पिनू गुरुजी, दलाल सुखदेव देवतळे, जोडमोहा येथील एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पॉक्सो, अत्याचार व अनुसूचित जमाती कायद्यानुसार शून्य गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या आईविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. पीडित मुलगी व तिच्या आईच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. संपूर्ण घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याने गुन्हा तेथे वर्ग झाला असून कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी याचा अधिक तपास करत असल्याची माहिती वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी दिली.