scorecardresearch

पन्नासावर किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित!

मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, शासकीय आयुर्वेद, दंतसह इतर शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांसह वर्ग तीन व चारचे कर्मचारी सकाळपासून दुपारी एक पर्यंत संपात सहभागी झाले.

अर्ध्या दिवसाच्या संपात रुग्णांचा जीव टांगणीला 

नागपूर :  मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, शासकीय आयुर्वेद, दंतसह इतर शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांसह वर्ग तीन व चारचे कर्मचारी सकाळपासून दुपारी एक पर्यंत संपात सहभागी झाले. त्यामुळे येथील पन्नासावर किरकोळ शस्त्रक्रिया स्थगित झाल्या. तर अतिदक्षता विभागात प्रशिक्षित परिचारिका नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. रुग्णालय प्रशासनाने मात्र संपाचा काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा केला.  मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डॉ. आंबेडकर रुग्णालय, शासकीय आयुर्वेद रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालयसह इतरही शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांसह वर्ग तीन व चारचे कर्मचारी बुधवारी सकाळी संपात सहभागी झाले. येथील रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून प्रशासनाकडून नर्सिगच्या विद्यार्थिनींना अतिदक्षता विभागासह इतरही वार्डात नियुक्त करण्यात आले होते. या सगळय़ांवर नियंत्रणाची जबाबदारी निवासी डॉक्टरांवर होती.  स्वच्छतेचे काम विस्कळीत होऊ नये म्हणून बाह्यस्त्रोतचे कर्मचारी वाढवले होते.

प्रशासनाकडून एकही अत्यवस्थ रुग्णांवरील शस्त्रक्रिया स्थगित होऊ नये म्हणून पर्याप्त सोय केली होती. परंतु सर्वाधिक होणाऱ्या किरकोळ शस्त्रक्रिया मोठय़ा प्रमाणावर स्थगित झाल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा दावा आहे. महत्त्वाच्या सर्व शस्त्रक्रिया करण्यात प्रशासनाला यश आले. सकाळी बाह्यरुग्ण विभागातील द्वार वेळेवर उघडले जावे म्हणूनही महाराष्ट्र सुरक्षा दलाची मदत घेतली गेली. आंदोलक परिचारिकांनी मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालय परिसरात गोळा होत  जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. परंतु वैद्यकीय अधीक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांनी आंदोलकांची समजूत काढल्यावर दुपारी एकच्या सुमारास सगळय़ा परिचारिका वार्डात परतल्या.

कर्मचारी हजेरी लावून बेपत्ता !

मेडिकल, मेयोसह इतरही शासकीय रुग्णालयांतील आंदोलकांनी शासनासोबत वरिष्ठ पातळीवर झालेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर दुपारी एक वाजता सेवा सुरू केली. परंतु या रुग्णालयांतील काही आंदोलक दुपारी हजेरी लावून बेपत्ता झाल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने बहुतांश कर्मचारी सेवेवर परतल्याचा दावा केला.

परिचारिकांच्या आंदोलनात फूट!

मेडिकलमध्ये सकाळच्या सत्रात १ हजार २९ परिचारिका कार्यरत आहेत. पैकी ८३३ परिचारिका संपात सहभागी झाल्या. ७७ विविध कारणांनी आधीच रजेवर होत्या.  सुमारे १०० परिचारिकांनी  हजर राहून सेवा दिली. पैकी बहुतांश परिचारिका अत्यवस्थ रुग्ण असलेल्या वार्डातच होत्या अशा प्रशासनाचा दावा आहे.  दिवसभरात मेडिकलमध्ये ९ मोठय़ा, १६ किरकोळ, ३६ इतर प्रकारच्या शस्त्रक्रिया झाल्या. परंतु नेहमीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे, हे विशेष.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minor surgery postponed lives patients were hanging ysh

ताज्या बातम्या