नागपूर : समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे कोवळ्या वयातील मुले डिजिटली व्यसनांच्या आहारी जात आहेत. माध्यमांवरील रील्सवरून प्रसारित होणाऱ्या मजकुरावर कशाचेही बंधन उरलेले नाही. त्यामुळे चुकीचे मजकूर मुलांच्या हाती पडून त्यांच्यात विविध प्रकारचे न्यूनगंड आणि विक्षिप्त वृत्ती बळावत चालली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नागपुरात समोर आली. एका अल्पवयीन मुलाने त्याच्याहून वयाने लहान दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार समोर आल्यावर खळबळ उडाली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
आरोपी मुलगा हा १६ वर्षांचा आहे. तर पिडीत मुलांचे वय अनुक्रमे ८ व १२ वर्ष इतके आहे. पिडीत मुलांचे आईवडील कामगार असून ते शाळेत जातात. मात्र आईवडील कामावर गेल्यावर मुले घरी एकटेच असतात. आरोपी मुलगा हा त्यांच्या परिचयाचाच होता. त्याने काही दिवसांअगोदर दोन्ही मुलांना धाक दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. आरोपीने भिती दाखविल्याने पिडीत मुलांनी कुणालाच काही सांगितले नाही. मात्र त्यानंतर आरोपीची हिंमत वाढली व त्याने रविवारी दुपारी त्यांच्यावर अत्याचार केला.
सायंकाळी पिडीत मुलांचे पालक घरी आले. त्यावेळी एका मुलाला वेदना होत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी मुलाला काय झाले हे विश्वासात घेऊन विचारले असता हा प्रकार त्याने सांगितला. पालकांनी तातडीने वाठोडा पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार केली. पोलिसांनी मुलांची वैद्यकीय तपासणी केली. अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची रवानगी बालसुधारगृहात केली.आरोपीविरोधात ॲट्रोसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
सायबर ठगाने लुबाडले सव्वा कोटी
आयुष्यभर बँकेत प्रामाणिक सेवा देऊन निवृत्तीनंतर शांत जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला सायबर ठगांनी अक्षरशः हादरवून सोडले. गणेशपेठ परिसरात राहणाऱ्या गेडाम या निवृत्त बँक कर्मचाऱ्याला ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवत सायबर ठगांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातला. गणेशपेठ परिसरात राहणारे गेडाम यांना आधी व्हॉट्स अपवरून एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण सक्तवसुली संचालनायातून (ईडी) बोलत असल्याचे सांगत मानवी तस्करी गुन्ह्यात आपल्या खात्यात आर्थिक व्यवहार झाल्याची भिती दाखवली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत गेडाम यांना सीबीआयचे अधिकारी भासवणाऱ्याने अटकेचे वॉरंट निघाल्याची भिती दाखवली. सध्या डिजिटली अटक होत आहे, प्रत्यक्षात अटक टाळाळची तर पैसे द्या अशी भिती गेडाम यांना दाखवण्यात आली. गेडाम यांच्याकडून खात्याचा गुप्त क्रमांक मिळवत सायबर ठगांनी १० वेळा वेगवेगळ्या खात्यांवर १ कोटी १३ लाख रुपये वळती केले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी १५ लाख रुपये गोठवले आहेत. राजस्थान आणि हरियाणातून हा व्यवहार झाल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

