scorecardresearch

‘दोषसिद्धी’त मीरा-भाईंदर प्रथम; अमरावती दुसऱ्या, तर नागपूर सहाव्या क्रमांकावर

गुन्हा घडल्यानंतर तंतोतंत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात (दोषसिद्धीत) मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अव्वल स्थानावर असून या वर्गवारीत नागपूर पोलीस आयुक्तालयाचा राज्यात सहावा क्रमांक आहे.

अनिल कांबळे

नागपूर : गुन्हा घडल्यानंतर तंतोतंत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात (दोषसिद्धीत) मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अव्वल स्थानावर असून या वर्गवारीत नागपूर पोलीस आयुक्तालयाचा राज्यात सहावा क्रमांक आहे. ‘टॉप फाइव्ह’मध्ये विदर्भातील अमरावती हे एकमेव पोलीस आयुक्तालय ठरले.

भारतीय दंड विधान (आयपीसी) अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयात दोषसिद्धीचे प्रमाण ५५.३६ टक्के आहे. या वर्षीची दोषसिद्धीची आकडेवारी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. यामध्ये नव्यानेच तयार झालेले मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय पहिल्या क्रमांकावर, तर अमरावती आयुक्तालय दुसऱ्या क्रमांकावर आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय राज्यात सहाव्या, तर नाशिक पोलीस आयुक्तालय सर्वात शेवटी आहे. मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे दोषसिद्धीचे प्रमाण ८९.६३ टक्के आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय ५८.४९ टक्के, तर नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे दोषसिद्धीचे प्रमाण ५१.६३ टक्के आहे.

दोषसिद्धीवाढीसाठी गांभीर्याची गरज

 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास आणि दोषारोपपत्र तयार करेपर्यंत तपास अधिकारी बदलत राहतात. त्यामुळे तपासात नियमितता राहत नाही. काही अधिकारी थातूरमातूर तपास करतात. त्यामुळे न्यायालयात प्रकरण टिकू शकत नाही. दोषसिद्धीच्या वाढीसाठी पोलीस अधिकारी गंभीर असणे गरजेचे असते. अन्यथा न्यायालयातून आरोपी सुटण्याची शक्यता जास्त असते.

दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी कायदेविषयक तज्ज्ञ असलेल्या छाननी समितीची (स्क्रुटनी) मदत घेण्यात येते. विधि सल्लागार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दोषारोपपत्राची तपासणी करण्यात येते. भविष्यात दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करीत आहोत.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर

पोलीस आयुक्तालय दोषसिद्धी (टक्क्यांत)

मीरा भाईंदर ८९.६३

अमरावती   ५८.४८

नवी मुंबई   ५४.७४

ठाणे ५४.०८

मुंबई शहर   ५२.१८

 नागपूर     ५१.६३

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mira bhayandar amravati crime exactly investigation court indictment accused education ysh

ताज्या बातम्या