लोकसत्ता टीम
भंडारा : छत्रपती संभाजीनगर येथे प्रहार जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांच्या भव्य मोर्चासाठी भंडारा जिल्ह्यातील जवळपास दीड हजार महिलांना दिशाभूल करून नेण्यात आले. बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना सहलीसाठी नेत असल्याचे सांगून मोर्च्यात सहभागी होण्यासाठी नेण्यात आले. मात्र दोन दिवसांपासून या सर्व महिलांना वाऱ्यावर सोडण्यात आले असून त्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. काल रात्री ‘लोकसत्ता’ मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ताबडतोब दखल घेत या महिलांच्या मदतीला धाव घेतली. सध्या काही महिला शेगाव येथे तर काही परतीच्या प्रवासात आहेत.
काल ९ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात गर्दी करण्यासाठी सर्वच जिल्ह्यातील प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले. मात्र भंडारा जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे सभासद मंडळ बरखास्त असल्याने प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी ही जबाबदारी घेतली. त्यांनी युक्ती लढवून बचत गटातील महिलांना शेगाव, शिर्डी आणि औरंगाबाद येथे सहलीला नेत असल्याचे खोटे सांगून वेठीस धरले. गुंथारा, खुटसावरी, चांदोरी, कवलेवाडा, धारगाव, पहेला, टेकेपार, सातोना, खुरशीपार, राजेदहेगाव अशा विविध गावांतील बचत गटाच्या भंडारा जिल्ह्यातील ३० ते ४० ट्रॅव्हलची व्यवस्था करण्यात आली. यात जवळपास दीड हजार महिलांना नेण्यात आले.
आणखी वाचा-‘नीट’परीक्षेसाठी ‘एनसीईआरटी’ची पुस्तके वाचायची की नाही?
छत्रपती संभाजीनगर येथे पोहचल्यावर मोर्च्यात सहभागी होण्याबाबत महिलांना सांगण्यात आले. मात्र काही महिलांनी त्यासाठी नकार दिला तर काही महिला सहभागी झाल्या. एका महिलेने सांगितले की, काल त्यांच्या ट्रॅव्हल्स औरंगाबाद येथेच अडून होत्या. ट्रॅव्हल्स कंपनीला पैसे दिले नाही त्यामुळे डिझेल संपल्याने ट्रॅव्हल्स चालक अडून बसले होते. दोन दिवसांपासून या महिला आणि लहान मुले नाश्तावर असून राहण्याची, खाण्याची किंवा परत जाण्याची कोणतीही सोय नसल्याने या महिलांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागला. गीता बंसोड यांनी काल ‘लोकसत्ता’ शी बोलताना आपबिती सांगितली. त्यानंतर माध्यमांवर बातमी येताच सर्वत्र खळबळ उडाली. अखेर काही त्रस्त महिलांनी कदीन जालना पोलिस ठाणे गाठले. याबाबत भंडारा जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांनी औरंगाबादचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला आणि महिलांना काही मदत करता येईल का याबाबत बोलणे केले. त्यानंतर महिलांना एका ढाब्यावर जेवणासाठी नेण्यात आले. मात्र जेवणाचे बील या महिलांनीच स्वतःच्या खिशातून भरल्याचे त्यांनी सांगितले.
गीता बन्सोड यांनी माध्यमांना माहिती पुरवू नये म्हणून त्यांच्या बचत गटाच्या ग्रुप मध्ये आता त्यांना ब्लॉक करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. हा धक्कादायक प्रकार माध्यमांवर येताच काल छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या ट्रॅव्हल्स चालकांशी संपर्क करीत तिथे पोहचले. या महिलाना परत येण्यासाठी प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये डिझेल भरून देण्यात आले. सध्या काही महिला परतीच्या मार्गावर आहेत तर काही शेगाव येथे आहेत.
आणखी वाचा-वसतिगृहांबाबत मोठा निर्णय, विशेष कोटा न्यायालयाने केला रद्द
बच्चू कडू यांच्या स्वीय सहाय्यकांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक जिल्ह्यातून येणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांना देण्यासाठी ५० टक्के रक्कम सुरवातीला देण्यात आली होती. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात अंकुश वंजारी याला ५० टक्के रक्कम देण्यात आली होती. मात्र पैसे घेतल्यानंतर तो मोबाईल बंद करून फरार झाला आहे. त्यामुळे त्याच्याशी संपर्क झालेला नाही. बच्चू कडू यांचे स्विय सहायक्कानी सांगितले की , अंकुश वंजारी आधीच बरखास्त होता, आता पक्षाच्या वतीने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास अंकुश वंजारी याच्याविरोधात पोलीस ठाण्यात ४२० अंतर्गत तक्रार करण्यात येईल.
© The Indian Express (P) Ltd