अकोला : छत्तीसगडमधून बेपत्ता झालेला मूकबधिर बालक एकटाच वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे आढळून आला. पालकांसोबत पुनर्भेट घडवून आणण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. अकोला जिल्हा बाल संरक्षण कक्ष व विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर केला. त्यातून हरवलेल्या मूकबधिर बालकाचे कुटुंब शोधण्यात यश मिळवले. संपर्क साधल्यावर ‘व्हिडिओ कॉल’वर बालकाला बघताच पालकांना गहिवरून आले. बालकासोबत सुमारे पाच महिने १० दिवसांनंतर पुनर्भेट घडताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
नेमकं प्रकरण काय?
वाशीम जिल्ह्याच्या रिसोड पोलीस ठाण्यांतर्गत २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एक मूकबधिर बालक पालकाविना भटकताना आढळून आला. त्याला वाशीम बाल कल्याण समितीने अकोला शासकीय बालगृह येथे दाखल केले. बालकाचा पत्ता व कुटुंबाचा शोध घेण्यासाठी समितीने जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
सांकेतिक भाषेद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न, पण
शासकीय मूकबधिर विद्यालयातील शिक्षिकांच्या मदतीने सांकेतिक भाषेद्वारे बालकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यातून आवश्यक माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर आधार केंद्रावर आधार नोंदणी केली. सुमारे २० दिवसानंतर आधार ग्राहक सेवा क्रमांक १९४७ वर संपर्क साधला असता संबंधित नोंदणी अगोदरच झाल्यामुळे रद्द झाल्याची माहिती मिळाली. बालक हरवलेला व मूकबधिर असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष विनंती केली. त्यानुसार ग्राहक सेवा केंद्राने तक्रार नोंदवून पुढील कार्यवाही सुरू केली.
आधारवरून कळले बालक ‘छत्तीसगड’ राज्यातील
सुमारे १५ दिवसांनी बालकाचा जुना आधार नोंदणी क्रमांक प्राप्त झाला. पुढील कार्यवाहीसाठी आवश्यक माहिती मुंबई येथील आधार कार्यालयाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर बालकाचा आधार क्रमांक उपलब्ध झाला. ३ ऑगस्ट रोजी बालकाला बार्शीटाकळी येथे नेण्यात आले. डोळ्यांचे स्कॅनिंग व बोटांचे ठसे घेऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आधार कार्ड काढले. त्यावरून बालकाचा पत्ता छत्तीसगड राज्याच्या रायगड जिल्ह्यातील खरसाण येथील असल्याचे निष्पन्न झाले.
पालक झाले भावूक
आधारवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून ‘व्हिडीओ कॉल’द्वारे बालकाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. पाच महिने १० दिवसानंतर बालकाला बघताच पालक अत्यंत भावूक झाले. ५ ऑगस्ट रोजी बालकाचा भाऊ अकोला येथे दाखल झाला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या समन्वयाने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी.सातवळेकर यांच्या हस्ते बालकाला त्याच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले.
