अमरावती : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प येथे स्लॅब कोसळून मुंबई- पुणे वाहतूक ठप्प झाली आहे. दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालेल्या या ‘मिसिंग लिंक’वर खड्डे देखील पडले आहेत. या प्रकल्पाच्या दर्जावरून आणि प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयी वरून काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत कडक शब्दांत टीका केली आहे.

‘४० टक्के टक्केवारीचे सरकार’

यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारचा निषेध करत, ‘४० टक्के टक्केवारीचे सरकार’ अशी जोरदार टीका देखील केली आहे. हे सरकार महाराष्ट्राचा विकास करत नसून केवळ टक्केवारीचे गणित सांभाळत आहे. विकासाच्या नावाखाली आणल्या जाणाऱ्या प्रकल्पांमागे सरकारचे दुसरेच काहीतरी छुपे नियोजन असते, असा थेट आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील जनतेला हा प्रकार अजिबात आवडलेला नाही आणि जनता या सरकारला कधीही माफ करणार नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

‘इन्फ्रा मॅन’ काय करत आहेत?

प्रकल्पाच्या दुरवस्थेवर संताप व्यक्त करताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, मिसिंग लिंकची काय अवस्था झाली आहे, हे आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. देवेंद्र फडणवीस स्वतःला ‘इन्फ्रा मॅन’ म्हणवून घेतात, पण हे ‘इन्फ्रा मॅन’ नेमके काय करतात, हेच कोणाला समजेनासे झाले आहे. उद्घाटनानंतर लगेचच पडलेल्या खड्ड्यांवरून जेव्हा प्रश्न विचारले जातात, तेव्हा ‘ही केवळ एक टेस्ट होती’ असे बेजबाबदार वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस करतात. तर दुसरीकडे शासकीय अधिकारी हे खड्डे किरकोळ असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत.

कामाचा बोजवारा उडाला

‘मिसिंग लिंक’च्या उद्घाटनावेळी तिथे बळी दिला गेल्याची चर्चाही मध्यंतरी कानावर आली. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली फक्त मोठ्या घोषणा करायच्या, अवाढव्य आकडे दाखवायचे आणि शेवटी मात्र कामाचा बोजवारा उडवून गोंधळ घालायचा, हेच या सरकारचे काम आहे, असे देखील यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

क्रेडिट तुमचे, मग टक्केवारीची जबाबदारी कोणाची?

इन्फ्रास्ट्रक्चरच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारून त्याचे क्रेडिट घेण्यासाठी सरकार पुढे असते. पण या कामांमध्ये जी टक्केवारी चालते, त्याचे क्रेडिट कोण घेणार? सध्याच्या सरकारमध्ये जे काही सुरू आहे, ते महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत असहनशील आहे, अशा शब्दात यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे.