नागपूर : नागपुरातील फेटरी येथील ओयो हॉटेलमध्ये घडलेल्या युवतीच्या खुनाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. आरोपी घटनेनंतर अचानक गायब झाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तो नेमका कुठे गेला? जिवंत आहे की नाही? पोलिसांच्या हाती लागेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, अखेर या थरारक प्रकरणाचा उलगडा झाला असून, खुनातील आरोपीला पोलिसांनी शिताफीने नागपूरहून दिल्लीला रेल्वेने पसार होतांना सिनेस्टाईल पकडले.
कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेटरी येथील ओयो हॉटेलमध्ये २२ जानेवारी २०२६ रोजी एका युवतीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सौरभ उर्फ बिट्टू जामगडे (२५) रा. आष्टी, ता. कळमेश्वर, जि. नागपूर याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, युवतीची हत्या केल्यावर घटनास्थळावरून आरोपी फरार झाला आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि सावनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त पथके तयार करण्यात आली.
आरोपीच्या शोधासाठी चार स्वतंत्र तपास पथके कार्यरत करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी घटनेच्या दिवशी पुण्याकडे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथके पुणे व पिंपरी परिसरात शोध घेत असतानाच अचानक एक नवे धागेदोरे हाती लागले. आरोपीने राज्य सोडून बिहारकडे पलायन केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यामुळे तपासाला वेगळीच दिशा मिळाली. दरम्यान, २९ जानेवारी रोजी आरोपी मौदा तालुक्यातील महालगाव परिसरात असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांचे पथक त्या दिशेने सरकले असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी नागपूरहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या तेलंगणा एक्सप्रेसमध्ये असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. भोपाळ रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपीचा रेल्वेत शोध घेतला गेला. अखेर भोपाळ येथे तेलंगणा एक्सप्रेसमध्ये आरोपी सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी कळमेश्वर पोलिसांकडे सुपूर्द केले. सौरभ उर्फ बिट्टू जामगडे याला अधिकृतरीत्या अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. न्यायालयाने आरोपीला ४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

