यवतमाळ – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) ही राज्य शासनाची व खासगी तसेच सरकारी रुग्णालयात मोफत उपचार देणारी योजना आहे. आतापर्यंत या योजनेत रुग्णालयात दाखल राहून उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत उपचार मिळत होते.

मात्र, आता ही योजना बाह्यरुग्ण विभागाची सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्वच उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना योजनेअंतर्गत नव्याने समाविष्ट असलेल्या सुमारे दोन हजारांहून अधिक आजारांवरील उपचारांचा आर्थिक लाभ घेता येणार आहे.

ही योजना महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी लागू आहे. याअंतर्गत आतापर्यंत रुग्णालयात दाखल झालेल्या व ज्यांच्यावर शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचार करण्यात येतात. आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यामध्ये योजना लागू नव्हती. मात्र, आता ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे रुग्णांना उपचारांचा लाभ मिळण्यासोबतच आरोग्य केंद्रांच्या विकासासाठीही निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे योजनेची व्याप्ती वाढेल. तसेच, योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीतील काही हिस्सा आरोग्य केंद्रांच्या सुधारणा व अद्ययावत सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या निधीतून फर्निचर, वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदी करता येणार आहे.

राज्यात सध्या शहरी व ग्रामीण भागात मिळून दोन हजार ६०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १० हजारांहून अधिक आरोग्य उप केंद्रे असून, ही सर्व केंद्रे योजनेंतर्गत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सध्या योजनेत एक हजार ३०० उपचारांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात हा आकडा वाढवून दोन हजार ते दोन हजार ३०० पर्यंत नेण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व महापालिका, जिल्हा परिषद, त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्य केंद्र आणि शहरी आरोग्य केंद्र यांचा याअंतर्गत समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य उपचारांचे संरक्षण दिले जाते. म्हणजेच कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्य हा लाभ घेऊ शकतात. या योजनेत ३४ वैद्यकीय शाखांमधील शस्त्रक्रिया व उपचारांचा समावेश आहे. आधीपासूनच अस्तित्वात असलेले आजारही यामध्ये दिले जातात.

राज्यातील सर्वच नागरिक या योजनेत पात्र आहेत. ते राज्यातील कोणत्याही सरकारी किंवा खासगी संलग्न रुग्णालयात, योजनेच्या संकेतस्थळावर दिलेल्या रुग्णालयांमध्ये आगामी रक्कम न भरता (कॅशलेस) उपचार घेऊ शकतो. नवीन बदलांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.