बुलढाणा : पुढील वर्षी होऊ घातलेल्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीची प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालविली असताना आता मनसेने यात उडी घेतली आहे. चिखली येथे पार पडलेल्या बैठकीत यादृष्टीने आढावा घेणाऱ्या नेत्यांनी बुलढाण्यात लढण्याची घोषणाच करून टाकली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडे दोन वेळा कोकण दौरा केला. रत्नागिरी येथील जाहीर सभेत त्यांनी लोकसभा निवडणुका ताकदीनिशी लढणार असल्याचे घोषित केले. या पार्श्वभूमीवर चिखली येथे लोकसभेच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा घेण्यात आला. यावेळी मनसे नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर व राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क नेते विठ्ठल यांनी बुलढाणा मतदारसंघाची निवडणूक ताकदीने लढण्याची घोषणाच केली.




हेही वाचा – गडचिरोली पोलिसांनी घेतला ४० लाखांच्या तीनशे मोबाईलचा शोध, नागरिकांनी मानले आभार
यावेळी या नेत्यांनी भाजपा, सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर खरपूस टीका केली. राज्याचे राजकारण रसातळाला गेले असून स्वार्थासाठी नेते कोणत्याही पक्षात जात आहेत. याला जनता कंटाळली असून या स्थितीत मनसे हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा उभयतांनी केला. तीनदा खासदार होऊनही प्रतापराव जाधव यांना पदाच्या कर्तव्याची जाण नसून त्यांनी एकही मोठा प्रकल्प आणला नाही.
लोकसभेच्या निवडणुका आल्या की, जालना खामगाव रेल्वे मार्ग, लोणार सरोवराला जागतिक पर्यटन स्थळ दर्जा यावर बोलतात. निवडणूक लढविण्याची तयारी करणाऱ्या भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, उ.बा.ठा शिवसेना यांच्याकडेही विकासाचे नियोजन नाही. यामुळे मनसे बुलढाणा लोकसभा ताकदीने लढणार आणि जिंकणार, असा दावा या नेत्यानी बोलून दाखविला.
हेही वाचा – जास्त चहा प्याल तर ‘टकलू’ व्हाल! चीनमध्ये संशोधन, केसगळती थांबवण्यासाठी…
यावेळी विधानसभा अध्यक्ष गणेश बरबडे, मेहकर, लक्ष्मण जाधव खामगाव, मदन गायकवाड, सहकार सेनेचे संजय पळसकर, शेतकरी सेनेचे शैलेश गोंधणे, प्रदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष शिवा पुरंदरे, प्रतिक लोखंडकार वाशिम जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. परिचय योगेश काळे, प्रास्ताविक अशोक पाटील, संचलन शैलेंद्र कापसे तर आभार प्रदर्शन नारायण देशमुख यांनी केले.