नागपूर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच राज ठाकरे यांनी वेगळे होत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापित केली. शिवसेना व मनसे एकमेकांविरोधत लढलेत. दोन्ही पक्ष व भाऊ एकत्र यावे, अशी अनेक शिवसेना व मनसे प्रेमींची इच्छा होता. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मुंबई आणि मराठी मानसाला फायदा होईल, त्यांची ताकद वाढेल, अशी अपेक्षा समर्थकांकडून करण्यात येत होती. अखेर २० वर्षानंतर दोन्ही भाऊ एकत्र आले. ते महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या माध्यमातून. मतविभागनी टळणार असल्याने निवडणुकीत याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु निवडणुकीत त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे दिसून आले.
मुंबईत मनसेचे ६ तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसनेचे ६५ नगरसेवक आले. तुलनेत भाजपला मोठा फायदा झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मदतीने भाजपने सत्ता काबिज केली. राज ठाकरे व उद्धव ठाकरे निवडणुकीच्या आठ, नऊ महिन्यापूर्वी एकत्र आले असते तर चित्र वेगळे असते, असं मत मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्याकडे नागपूर जिल्ह्याच्या संपर्क अध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासोबत पक्षाच्या बांधणीसाठी ते नागपुरात आले. यावेळी रविभवन येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षात मोठे फरबदल होतील. काम करणाऱ्यांनाच पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पद घेऊन काम न करणाऱ्यांना बाजुला सारण्यात येईल. पक्षाला मजबूत करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. पद देताना कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हत पाहण्यात येईल. तशा सूचना राज ठाकरेंनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
संभूस म्हणाले की, मागील निवडणुकीत पक्षाला पारसे यश मिळाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पुढील काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून सदस्य नोंदणीही सुरू करण्यात येणार आहे. ते म्हणाले की, महापालिका निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. युतीचाही फायदा दिसून आला नाही. उद्धव ठाकरेंसोबतची युती ही वेळेवर झाली. ही युती आठ, नऊ महिनेपूर्वी झाली असती तर फायदा झाला असता. वेळेवर युती झाल्याने काहींची मानसिकता बनण्यास वेळ लागला. परंतु समोर त्याचा फायदा होईल. पुणे, नाशिक येथे केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंच्या पक्षाची साथ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विशाल बडगे, चंदू लाडे उपस्थित होते.
हिंदीला नाही, हिंदी सक्तीला विरोध
संभूस म्हणाले की, मराठीचा मुद्दा हा मुनसेचा प्रमुख आहे. त्यावर तडजोड करणार नाही. आमचा हिंदी भाषिक किंवा हिंदीला विरोध नाही. परंतु हिंदी सक्तीला विरोध आहे. हिंदी भाषिकांनी व्यवसाय करावा, परंतु मराठीचा वापर करावा. त्यांनी मराठीचा स्वीकार केला पाहिजे. मराठीतून व्यवहार केला पाहिजे. हिंदी भाषिक मतदार संघ तयार करतात, त्याला विरोध असल्याचे ते म्हणाले.
स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठे?
हेमंत संभूस म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या नावावर शहरातील काही भागाचा विकास करण्यात येत आहे. एका भागाचा विकास म्हणजे संपूर्ण शहराचा विकास होत नाही. या स्मार्ट सिटीच्या नावावर मोठ्या प्रमाणात पैसा आला. या स्मार्ट सिटी तयार न झाल्याने तो पैसा गेला कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नागपुरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शुक्रवारी तलावाचे सौंदर्यीकरण आणि कौशल्य विकास योजनेचे काय झाले, यावरही मनसेकडून आवाज उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
