जनतेशी बोलल्यानंतरच पक्ष प्रवेशाबाबत निर्णय

गुजरातला दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात प्रचार करण्यासाठी काँग्रेसच्या व्यासपीठावर जाणार आहे. मात्र, काँग्रेस किंवा कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश करण्याचा विचार नाही. पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय विदर्भातील जनतेशी बोलून घेणार आहे. वेळप्रसंगी स्वत:चा पक्ष स्थापन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढेन, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

खासदार आणि भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले शनिवारी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे राजीनामा हा तडकाफडकी नाही तर विचार करून दिला आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर जाण्याचा उद्देश एवढाच की गुजरातमध्ये काँग्रेस विरोधी पक्ष आहे. त्या राज्यात भाजपला पराभूत करण्याएवढी काँग्रेसची स्थिती आहे. ममता बॅनर्जी किंवा शरद पवारांचा पक्ष असता तर त्या पक्षांच्या व्यासपीठावर गेलो असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार किती खोटारडे आणि नागरिकांची फसवणूक करणारे आहे, हे सांगण्यासाठी निवडणुकीची हीच योग्य वेळ असल्यामुळे काँग्रेसच्या व्यासपीठाचा उपयोग करणार आहे. पोटनिवडणूक झाली तरी निवडणूक लढण्याचा निर्णय सध्या घेतलेला नाही. मुळात भंडारा-गोंदिया मतदार संघात पोटनिवडणूक होईल किंवा नाही याबाबत शंका आहे. तसे गुजरातच्या निवडणुकीवरून वाटत आहे. मात्र, त्याबाबत अजून कुठलाच विचार केलेला नाही, असे पटोले म्हणाले.

मणिशंकर अय्यरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतच्या जातीचा उल्लेख करत गुजरातच्या जनतेची सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मी माझ्या जातीसाठी त्यांना न्याय मागितला तर माझा आवाज दाबण्यात आला. गुजरातमध्ये जाऊन मोदी यांच्या जातीची चौकशी करणार आहे आणि त्यांचे जात प्रमाणपत्र तपासले जाणार आहे. पंतप्रधानांनी बोलविलेल्या एका बैठकीत विविध राज्यातील खासदारांनी शेती प्रश्नांवर आपली भूमिका मांडली होती, तेव्हा मोदी यांनी त्यावेळी वयाने मोठे असलेल्या अनेक खासदारांना दाटले होते.

प्रस्तावित ओबीसी मंत्रालयासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला असताना त्या विषयावर बोलणे टाळून, असे मंत्रालय प्रशासकीय खर्च वाढवेल म्हणून त्यांनी ओबीसी मंत्रालयाला विरोध केला. त्या बैठकीत भाजपच्या कोणकोणच्या नेत्यांना त्यांनी दाटले होते, हे उघड केले तर अनेकांच्या नोकऱ्या जातील, असेही पटोले म्हणाले.

पटोलेंचा इशारा

भारतीय जनता पक्षाला अंगावर येण्याची किंवा षड्यंत्र रचण्याची सवय आहे. मात्र, माझ्याकडे सर्वाची गुपिते आहेत. कोणी माझ्या अंगावर आले तर त्यांची माहिती बाहेर जनतेमध्ये पोहोचवली जाईल, असा इशाराही पटोले यांनी दिला. केंद्र व राज्य सरकार पारदर्शीपणे कारभार करीत असल्याचा दावा करीत असेल तर नोटीबंदीनंतर किती पैसे बँकेत आले, काळा पैसा किती बाहेर काढला याचा खुलासा सरकार का करीत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वेगळ्या विदर्भाविषयी लोकांची भावना लक्षात घेऊन त्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेईन असेही त्यांनी सांगितले.

मुंडे असते ही वेळ आली नसती

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे ओबीसीच्या मुद्यावर लढत असताना भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्यात आणि केंद्रात सरकार आल्यानंतर सातत्याने आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू दिले जात नाही. कदाचित आज गोपीनाथ मुंडे हयात असते तर माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली नसती आणि त्यांनी माझ्यासाठी संघर्ष केला असता, असेही पटोले म्हणाले.