नागपूर : नागपूरपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील मोगरकसा सफारीतून आनंदाची बातमी समोर आली आहे. मोगरकसा पर्यटन सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच एका वाघिणीने बचड्यांना जन्म दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पर्यटकांना वाघिणीसोबत सध्या एकाच बछड्याचे दर्शन झाले असले तरीही आणखी एक किंवा दोन बछडे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत वाघिणीचा बछडा तिच्यासोबत तिच्या पावलांमध्ये पाऊल टाकून चालायला शिकत असल्याचे दिसून येत आहे.

नागपूरपासून सुमारे ७५ किलोमीटर अंतरावर असलेले आणि गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेले मोगरकसा तलाव परिसर आता पुन्हा पर्यटकांच्या नकाशावर येण्याची चिन्हे आहेत. वन विभागाने येथे प्रस्तावित केलेल्या पर्यावरण-पर्यटन प्रकल्पाला अखेर गती मिळाली आणि हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.

प्रकल्प कधी

२०२० मध्ये संकल्पित करण्यात आलेला हा प्रकल्प विविध प्रशासकीय, रसद व आर्थिक अडचणींमुळे रखडला होता. मात्र, अलीकडेच आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग आला आहे. या प्रकल्पांतर्गत मोगरकसा वन अभयारण्यात तलावाच्या काठावर पर्यटकांसाठी सहा पर्यावरणपूरक ‘इको हट्स’ उभारण्यात आले आहेत. यामुळे पर्यटकांना जंगलाच्या सान्निध्यात वास्तव्यास राहण्याचा अनुभव घेता येणार आहे.

विशेष आकर्षण

सुमारे १६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला हा मिश्र वनप्रदेश रामधाम–रामटेक–नागरधन–मोगरकासा–पेंच या पर्यटन सर्किटचा भाग आहे. सागवान, बांबू, ऐन, सलाईसह विविध वृक्षसंपदेने नटलेले हे जंगल पक्षीनिरीक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या परिसरात वाघ, बिबट्या, सांबर, अस्वल, चितळ यांसह विविध वन्यप्राणी आढळतात. त्यामुळे प्रस्तावित पर्यावरण-पर्यटन केंद्रात जंगल सफारीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परिसरात अद्याप मोठ्या प्रमाणावर विकास न झाल्याने नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले असून, नव्या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे मोगरकसा पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची दाट शक्यता आहे.

कसे जाल

मोगरकासाला जाण्यासाठी नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरून पवनीपर्यंत सुमारे ६० किलोमीटर प्रवास करून, तेथून हीवरा मार्गे मोगरकासा येथे पोहोचता येते. वनसंपदा, शांतता आणि वन्यजीवांचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण लवकरच नवे आकर्षण ठरणार आहे.