नागपूर : नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभासाठी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे स्वतः दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या घरी गेले आणि त्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांचे निमंत्रण

५ जून २०२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय चा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारोप समारंभासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना निमंत्रित करण्याचे ठरले. मात्र, त्यांना निमंत्रित करण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वतः स्वीकारली. ते आशा भोसले यांच्या घरी गेले आणि या कार्यक्रमात येण्यासाठी त्यांनी स्वतः आशाताईंना निमंत्रण दिले.

आशाताईंची पत्र लिहून दिलगिरी

नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांनी, प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचे संघप्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून कळवले. त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, भागवत यांनी घरी येऊन वैयक्तिकरित्या आमंत्रित केल्याचा त्यांना सन्मान वाटतो. पत्रात, भोसले यांनी आरएसएसच्या कार्याचे “भारताच्या गौरवशाली भविष्यासाठी आशेचा किरण” म्हणून कौतुक केले आणि भविष्यात त्यांच्या कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावर भागवत यांनी लवकरच पुन्हा भेटायला येऊ असे उत्तर दिले.

मी लवकरच वैयक्तिक भेट घेईल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभासाठी संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्वतः आशा भोसले यांना आमंत्रित केले. मात्र, या कार्यक्रमाच्या काही दिवसांपूर्वीच त्या अमेरिकेहून परतल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना पुर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे सर्व तयारी झाली असतानाही त्यांना आपला नागपूर दौरा जड अंतकरणाने रद्द करावा लागला होता. तसे पत्र त्यांनी पाठवले व लवकरच वैयक्तिक भेट घेण्याचे आश्वासन दिले. आशा भोसले यांच्या भावनांचा आदर करत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्यांना लवकरच बरे वाटण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याआधी सरसंघचालकांची भेट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी निमंत्रित केल्यानंतर त्यांच्या भेटीला आशा भोसले येऊ शकल्या नाहीत, पण याआधी मात्र आशा भोसले नागपुरात अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीसाठी याआधी देखील त्या नागपुरात आल्या होत्या. मात्र, नंतर पुन्हा एकदा सरसंघचालकांच्या भेटीसाठी येण्याचे त्यांचे आश्वासन अपूर्ण राहिले.