बुलढाणा : देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथील जंतर मंतर येथे ‘झेन -जी ‘चे यशस्वी आंदोलन विविध अर्थाने गाजले. त्याचे पडसाद अजूनही देशभरात उमटत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल गुरुवारी तरुणाई शी अर्थात दोन हजार युवकांशी संवाद साधला. या संवादावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटत असताना सरसंघचालक मोहन भागवत हे बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.

संतनगरीतून दौऱ्यास प्रारंभ

ते आजपासून दोन दिवसीय शेगाव आणि खामगाव दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या सुरुवातीलाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी विदर्भ पंढरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले आणि चरणी नतमस्तक झाले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ-मृदुंगाच्या गजरात अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोहन भागवत यांनी मंदिर प्रशासनाकडून संस्थानच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

कडक बंदोबस्तात सकाळी आगमन

तत्पूर्वी, आज शुक्रवारी सकाळी ६ वाजताचे सुमारास हावडा एक्सप्रेसने सरसंघचालकांचे संत नगरी शेगावमध्ये आगमन झाले. रेल्वे स्थानकावर स्वयंसेवकांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संघाच्या एका स्थानिक कार्यकर्त्याच्या निवासस्थानी भेट देऊन अल्पोपहार घेतला. सरसंघचालकांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेगाव आणि परिसर क्षेत्रात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला.

खामगावात दाखल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज आणि उद्या अशा दोन दिवसीय बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. उद्या, ८ ऑगस्टला खामगाव येथील ऋषी संकुल परिसरात सूर्योदय पारधी समाज आश्रम शाळेत त्यांचे हस्ते नवीन बंदिस्त सभागृह आणि क्रीडा संकुलचे उद्घाटन होणार आहे. आज शेगाव दर्शनानंतर आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता सरसंघचालक मोहन भागवत यांचे कारने खामगावात आगमन झाले. यावेळी खामगाव शेगाव मार्गावर ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

खामगावात तालुका संघचालक संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी आज सरसंघचालक भागवत यांचा मुक्काम असणार आहे. आज दिवसभरात संघाच्या कार्यकर्त्यांच्या विविध बैठका होणार आहेत. उद्या, सकाळी साडेदहा वाजता ऋषी संकुल परिसरात सूर्योदय पारधी समाज आश्रम शाळेच्या कार्यक्रमाला मोहन भागवत उपस्थित राहणार आहे.