नागपूर: अमेरिका आणि इराण युद्धाला २० दिवस पूर्ण झाली. ज्यावेळी युद्ध सुरू झाले, त्यावेळीच सांगण्यात आले होते की, युद्ध काही दिवस चालेल. मात्र, युद्धाला २० दिवस पूर्ण झाले आणि सर्व जग संकटात सापडले. या युद्धाचा परिणाम फक्त अमेरिका, इराण आणि इस्त्रायलपुरताच मर्यादित राहिला नसून सर्वच देश भरडले जात आहेत. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जगाची चिंता वाढली आहे. युद्धाच्या विस दिवसानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

युद्धाच्या खायेत संपूर्ण जग आज डगमगल्याचे सर्वांना दिसत आहे. माझ्याकडे जे नाही ते दुसऱ्याकडून ओढून घेण्याची वृत्ती वाढली आहे. केवळ, स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्ववादातून जगामध्ये संघर्ष सुरू असल्याचे, भागवत म्हणाले.

२००० वर्षांपासून युद्धाचे उत्तर नाही

सनातन धर्माचे उत्थान व्हावे ही ईश्वरी इच्छा आहे. यासाठी भारताचे उत्थान होणे आवश्यक आहे. संपूर्ण जग आज डगमगले आहे. स्वार्थ आणि वर्चस्वासाठी युद्ध सुरू आहेत. दुसऱ्यावर राज्य करणे ही मुळात स्वार्थी वृत्ती आहे. युद्धाचे उत्तर शोण्याचा प्रयत्न २००० वर्षांपासून सुरू आहे. पण, त्याचे उत्तर कुणालाही मिळाले नसून वाद, विवाद आणि कट्टरता अधिक तिव्र होत आहे. सर्व समस्या जश्याच्या तशा आहेत. वाद वाढतच चालला असून जग विनाशेच्या छायेत उभा आहे. मूळ धारणा आणि विचार चूक असल्याने हे सगळे सुरू आहे. सर्वांना एकत्र जोडणारा धागा कुणाकडेच नाही. आमचे ऋषी-मुनी आणि पर्वजांच्या कृपेने सर्वांना जोडणारे तत्व केवळ भारताकडे आहे. विज्ञानही असाच विचार करत आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.

जगातील संघर्षाचे उत्तर भारताकडे

भारत हा मानवतावादावर विश्वास ठेवतो, तर इतर लोक अस्तित्वासाठीचा संघर्ष करतात. जो सर्वात समर्थ तोच टिकेल या तत्त्वांवर जगाचा विश्वास आहे. जगाला संघर्षाची नव्हे, तर सलोख्याची गरज आहे. सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर भारताकडेच याचे उत्तर आहे. शांतता हेच भारताचे मूळ स्वरूप आहे, असे भागवत म्हणाले.

डगमगत्या जगाला ‘धर्माचा’ आधार

डगमगत असलेल्या जगाला ‘धर्माचा’ भक्कम आधार देऊन, त्यात पुन्हा समतोल प्रस्थापित करणे ही भारताचीच जबाबदारी आहे. भारतातील लोक मानवतेच्या नियमांचे पालन करतात, तर उर्वरित जग जंगल म्हणजेच शक्तीच्या कायद्याचे पालन करते. डगमगत असलेल्या या जगाला धर्माचा आधार देऊन, त्यात पुन्हा समतोल निर्माण करणे हेच आमचे कार्य आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.