नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंघटना आहे. त्यामुळे भाजपचे अनेक आदेश हे संघाकडून दिले जातात असेही बोलले जाते. आज संघाचे महत्त्व हे देशपातळीवर नाही तर जगात वाढले आहे. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे तोंडभरून कौतूक केले. त्यांनी गडकरींचे कौतूक केल्याने हे काही राजकीय संकेत तर नाही ना, अशीही चर्चा रंगली आहे.
नेमका काय प्रसंग होता
तरुण भारतच्या शताब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त कविवर्य सुरेश भट सभागृहात झालेल्या मुलाखतीत डॉ. भागवत यांनी विविध विषयांवर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांना प्रश्न विचारण्यात आले. यात राजकारणी लोकांचे तरुणांमध्ये माठे आकर्षण असते. मात्र, ते समाजकारणाशिवाय राजकारण करण्यावर अधिक भर देतात. तेव्हा अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल, असा प्रश्नही करण्यात आला. यावेळी डॉ. भागवत म्हणाले की, पुढे नितीन गडकरी बसले आहेत. ते इतके मोठे राजकारणी असतानाही सर्वाधिक समाजकार्य करतात. त्यामुळे ते माझ्या दृष्टीने एक समाजकारणी आहेत. त्यामुळे राजकारणात जाऊनही समाजकारण करता येते असेही भागवत म्हणाले.
सरकारशी संघाचा संपर्क वाढला
कुठलीही संस्था मोठी झाली हे परिवर्तन होणे आवश्यक आहे. हल्ली शासन प्रशासनाशीही संघाचा संबंध येतो. त्यामुळे त्यासाठी वेगळी व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे. सगळे एकाच कामात उतरले तर खाचखळगे उडतात. त्यामुळे प्रदेश नावाची एक रचना राहणार असून ती त्यांच्या स्तरावर प्रदेशाशी संबंध ठेवेल. तसेच, दर महिन्याला किंवा दोन ते तीन महिन्यातून एकदा प्रत्येक स्तरावरील कार्यकारिणीने आपल्या कुटूंबासोबत एकत्र राहायला हवे. संपर्क वाढवायला हवा, यावरही काम केले जाणार असल्याचे, डॉ. भागवत म्हणाले.
संघाच्या कार्यपद्धतीत बदल नाही
संघाची कार्यपद्धती मात्र एकच राहणार आहे. त्यात कुठलाही बदल होणार नाही. कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार दर दहा-पंधरा वर्षांनी होत असतो. मात्र, दुसरी कार्यपद्धती संघाला सापडली नाही. मुळात संघाची कार्यपद्धती डोके खानारी आहे. मैत्री करायची आणि आपल्या उदाहरणातून परिवर्तन घडवायचे हीच संघाची कार्यपद्धती पुढेही राहणार आहे. परंतु, संघाची केंद्रीय रचना हे एक रूप आहे. ते काळानुसार बदलत राहणार, असेही सरसंघचालक म्हणाले.
