नागपूर: भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कायमच विरोध राहिलेला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा आपल्या भाषणातून फाळणीला विरोध दर्शवला. अशातच नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात भागवत यांनी फाळणीविषयी महत्त्वाचे विधान केले.
नेमके काय म्हणाले भागवत?
फाळणीनंतर भारतात आलेल्या लोक शरणार्थी नव्हते, तर मातृभूमी आणि धर्मावरील प्रेमामुळे विस्थापित झालेले संघर्षयोद्धे होते. ते त्यांचे भविष्य, संपत्ती आणि सर्वस्व मागे सोडून भारतात आले व नव्याने जीवन उभारले. त्यांच्यासाठी शरणार्थी या चुकीच्या शब्दाचा वापर झाला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी डिम्पी बजाज उपस्थित होत्या.
संकटांपासून पळ काढणारा आधीच पराभूत
संस्थेच्या ७५ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करताना भागवत म्हणाले, अशा टप्प्यांमुळे संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्याची आणि आपल्या उद्दिष्टांचे स्मरण करण्याची संधी मिळते. काळ बदलला असला तरी कार्यामागील निष्ठा आणि उद्देश बदलू नयेत. जीवनात संकटे आली तरी खचून जाऊ नका, प्रयत्न करणारा माणूसच यश मिळवतो, तर संकटांपासून पळ काढणारा आधीच पराभूत होतो. सुख आणि दुःख या दोन्ही अवस्थांकडे समतोल दृष्टीने पाहण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी दुःखातही आशेचा किरण शोधण्याचा सल्ला दिला.
रोजगार हे शिक्षणाचे अंतिम ध्येय नाही
शिक्षणाविषयी बोलताना भागवत यांनी रोजगारासाठीचे शिक्षण महत्त्वाचे असले तरी तेच अंतिम ध्येय नसल्याचे स्पष्ट केले. मनुष्याला विवेक, चांगले-वाईट यातील फरक समजून घेण्याची क्षमता विकसित करण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण आवश्यक आहे. हे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांतून मिळत नाही, तर शिक्षकांच्या आचरणातून आणि संस्कारांतून मिळते, असे भागवत यांनी सांगितले. चांगले मनुष्य बनणे आणि समाजहिताची जाणीव असलेली पिढी घडवणे, हाच शिक्षणाचा खरा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
