नागपूर: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने १३ जून रोजी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अयोध्या येथील राम मंदिर निर्माण निधी संकलनातील कथित गैरव्यवहार प्रकरणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. डॉ. भागवत काय म्हणाले पाहूया…
काय म्हणाले सरसंघचालक?
होसबळे यांनी अयोध्या येथील राम मंदिर निर्माण निधी संकलनातील कथित गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात जे विधान प्रसिद्ध केले आहे, माझीही तीच प्रतिक्रिया आहे, असे सरसंघचालक म्हणाले. नागपूर येथील आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शुक्रवारी निवेदन जाहीर करत राम मंदिरातील कथित गैरव्यवहारावर संघाची भूमिका स्पष्ट केली होती. ‘राम मंदिर देणगी चोरीच्या या कथित प्रकरणाने संपूर्ण हिंदू समाज आणि भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी आढळतील त्यांना कठोर आणि कडक शिक्षा झालीच पाहिजे’, अशी ठाम मागणी त्यांनी केली होती. या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊन ‘हिंदूविरोधी आणि देशविरोधी शक्ती हिंदू धर्माची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कठीण प्रसंगात हिंदू समाजाने आवश्यक तो संयम बाळगून अशा सर्व कारस्थानांना हाणून पाडावे’, असे आवाहन होसबळे यांनी केले होते. सरसंघचालक डॉ. भागवत यांनी सरकार्यवाह होसबळेंच्या या भूमिकेचे समर्थन केले.
होसबळे काय म्हणाले होते ?
राम मंदिरातील दान अपहारप्रकरणी संघाने प्रथमच भूमिका जाहीर केली. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी ‘एक्स’वर प्रतिक्रिया देताना सविस्तर भाष्य केले. ‘अयोध्येतील राम मंदिरातील अर्पण केलेल्या वस्तूंच्या कथित चोरीने संपूर्ण समाजाच्या भावना आणि श्रद्धांना तीव्र धक्का बसला आहे. या दुर्दैवी घटनेचा फायदा घेऊन हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्ती साऱ्या हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिंदू समाजाने या कठीण समयी संयम बाळगावा. त्यामुळे अशी कारस्थाने हाणून पाडता येतील. राम जन्मभूमी ट्रस्टने मंदिराच्या व्यवस्थापन आणि कामकाजातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलावीत. त्यामुळे राम मंदिराप्रति लाखो रामभक्तांची श्रद्धा आणि भक्ती अखंड व दृढ राहील,’ असे होसबळे यांनी नमूद केले आहे.
