नागपूर : देशातील तरुणाई ही लोकसंख्यात्मक देणगी आहे. तरुणांना योग्य दिशा आणि संधी दिल्यास देशाला मोठा लाभ होईल; मात्र त्यांचा योग्य प्रकारे उपयोग झाला नाही तर भविष्यात हीच तरुणाई समाजावर ओझे ठरू शकते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले. जेन झी तरुणांशी दहा दिवसांत दुसऱ्यांदा संवाद साधताना भागवत यांनी भविष्यातील पिढ्यांचा विचार करण्याचे आवाहन केले. ‘‘आजचे तरुण ३० वर्षांनंतर वृद्ध होतील. त्यामुळे केवळ स्वतःचा विचार न करता पुढील पिढ्यांच्या गरजांचाही विचार केला पाहिजे,’’ असे त्यांनी सांगितले.

भारताने विकासाचे निकष स्वतः ठरवावेत

भारताची तुलना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन किंवा न्यूझीलंडसारख्या देशांशी करून विकासाचे निकष ठरवू नयेत. भारताची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध संसाधने वेगळी आहेत. त्यामुळे देशाच्या परिस्थितीला अनुरूप अशी स्वतंत्र विचारप्रक्रिया आवश्यक आहे, असे भागवत म्हणाले.कॅनडा, अमेरिका किंवा चीनसारख्या मोठ्या भौगोलिक क्षेत्र असलेल्या अथवा मोठ्या संसाधनांचा साठा असलेल्या देशांची विकासपद्धती भारताला तशीच लागू करता येणार नाही. भारतातील समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्र उपाययोजना करण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘रोजगार म्हणजे केवळ नोकरी नव्हे’

‘‘तरुणाई ही लोकसंख्यात्मक देणगी आहे. तिला योग्य प्रकारे हाताळले तर देशाला मोठा फायदा होईल; अन्यथा भविष्यात समाजावर त्याचा भार पडू शकतो. तरुण भविष्यात देशाची कमावती शक्ती असतील. रोजगार म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर श्रम करणारे हातही त्याचा भाग आहेत. श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे,’’ असे भागवत यांनी सांगितले. तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे आणि अडचणींना धैर्याने सामोरे जाऊन यश मिळविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘भारताची दृष्टी केवळ पैसा कमावण्यापुरती नाही’

जगाचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात भौतिकवादी आहे. मात्र, भारताची दृष्टी केवळ पैसा कमावण्यापुरती मर्यादित नाही, असे भागवत यांनी नमूद केले. भारताच्या मूल्यव्यवस्थेला आणि परिस्थितीला सुसंगत असा विकासाचा मार्ग निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने जगाला भविष्यातील मार्ग दाखविण्याची आणि त्यात संतुलन निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यासाठी देशाने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

‘इतर देशांशी तुलना नको’

कार्यक्रमात मोठा तिरंगा फडकविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा संदर्भ देत भागवत यांनी राष्ट्रध्वजामागील भावना आणि भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा विचार करण्याचे आवाहन केले. ‘‘आपण भारत आहोत. भारताचा स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि विकासाची स्वतःची संकल्पना आहे. प्रगतीचे निकषही आपणच ठरविले पाहिजेत. इतर देशांशी तुलना करण्याऐवजी देशासाठी आणि स्वतःसाठी काय आवश्यक आहे, याचा विचार केला पाहिजे,’’ असे भागवत म्हणाले.