नागपूर : हिंदू धर्म संपूर्ण मानवतेच्या एकतेवर विश्वास ठेवतो. त्यामुळे जर कोणत्याही हिंदूला वाटत असेल की भारतात मुस्लिम नको तर तो व्यक्ती हिंदूच नाही. विविध धर्माचे मार्ग वेगवेगळे असू शकतात, परंतु सत्य व मानवता एकच आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘वन वर्ल्ड वन ह्युमिनिटी’ या विशेष कार्यक्रमात केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रतिक्रिया व्यक्त केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेवाडा येथील प्राणी उद्यानात पाहणीनंतर प्रसारमाध्यमाशी चर्चा केली. यावेळी त्यांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर विचारले असते त्यांनी सुरुवातीला भागवत का काय म्हणतात यावर आम्ही कधीही भाष्य करीत नाही, असे सांगितले. परंतु तेथे ज्या तत्त्वावर चर्चा झाली, ते पूर्णपणे बरोबर असल्याचे फडणवीस म्हणाले. सहिष्णुता ही हिंदुत्वाचा आत्मा आहे. हिंदू संस्कृती ही जगातील सर्वात जुनी आहे असून आम्ही आमची मूळ मूल्ये खूप दृढ ठवेल्यामुळे ती टिकून आहे. जगभरातून आक्रमणे होऊनही, आम्ही सहिष्णुतेने त्यांचा सामना केला आणि त्यापैकी अनेकांना आमच्या सांस्कृतिक प्रवाहात सामावून घेतले, असेही ते म्हणाले.
हिंदुंना धार्मिक सहिष्णुता शिकवण्याचा कुणी प्रयत्न करू नये
जगाने नाकारलेल्या विविध लोकांना भारताने आपल्यात सामावून घेतले. त्यामुळेच हिंदूंना धार्मिक सहिष्णुता शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे मी नेहमी म्हणतो. सहिष्णुता हिंदूंच्या रक्तातच आहे आणि ते हिंदुत्वाचे एक मूलभूत तत्त्व आहे. कोणी हल्ला केला तर त्याला प्रत्युत्तर देणे निश्चितच आवश्यक आहे. मात्र, एखादा हिंदू कधीही स्वतःहून हल्ला करत नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काय म्हणाले भागवत?
वेळोवेळी संपूर्ण जगालाही एकतेची जाणीव करून देणे हेच भारताचे ध्येय असल्याचे भागवत म्हणाले. आपण एक आहोत. विविधतेमुळे ही एकता अधिक सुंदर, समृद्ध झाल्याचे ते म्हणाले. जगात दोन प्रवृत्ती असल्याचे ते म्हणाले. जगा आणि जगू द्या हा विचार महत्त्वाचा असल्याचे भागवत म्हणाले. केवळ माझेच खरे आणि त्यांचेच संरक्षण करण्याची प्रवृत्ती संघर्ष निर्माण करते. मानवाने बंधुभावाने जगणे आवश्यक आहे. जगाला विविधतेतील एकतेची जाणीव करून देणे हे भारताचे दायित्व, जबाबदारी असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले. जगाला केवळ उपदेश करून नव्हे तर कृतीतून एकता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश द्यावा असे मोठे वक्तव्य त्यांनी केले.
