यवतमाळ : देशात विकास होत असला तरी त्याचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नसेल, तर त्या विकासाचा विचार पुन्हा करण्याची गरज आहे. जगातील सर्वांना सुखी ठेवायचे असेल तर देश सुखी असला पाहिजे आणि देशातील माणूस सुखी असला पाहिजे. त्यामुळे विकासाची दिशा ठरविताना समाजातील शेवटच्या माणसाचा विचार केंद्रस्थानी असला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज मंगळवारी यवतमाळ येथे केले.
अंत्योदय हे जगण्याचे तत्व
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळमधील दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या कार्याला यंदा तीन दशके पूर्ण झाली आहेत. पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी १९९७ मध्ये विवेकानंद छात्रावासाच्या माध्यमातून सुरू झालेला सेवाप्रवास पुढे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन आणि कमी खर्चातील जैविक शेतीच्या प्रयोगांपर्यंत विस्तारला आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी ‘अंत्योदय’ हे तत्त्व मांडले. पूर्वी देशात गरीब माणसाला कसेबसे पोटभर अन्न मिळत होते, मात्र ते आनंदी आणि सुखी असायचे. आता मात्र पोटभर अन्न मिळते, पण आज शेवटचा माणूस खरंच सुखी आहे का? विकासाची प्रक्रिया पुढे नेताना शेवटच्या माणसाचे जीवन अंतर्बाह्य समृद्ध आणि शुद्ध कसे होईल, याचा विचार झाला पाहिजे, असे भागवत म्हणाले. देशातील पहिला माणूस आणि शेवटला माणूस यांच्यातील दरी मिटली पाहिजे, असे ते म्हणाले.
शेती जगाच्या कल्याणाचे कर्तव्य
शेतीकडे केवळ उत्पादनाचे साधन म्हणून पाहता कामा नये, असे सांगताना त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीविषयक भूमिकेवरही भाष्य केले. शेतकरी शेतीला केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर जगाच्या कल्याणासाठीचे कर्तव्य म्हणून पाहतो. हीच भूमिका एकात्म मानववादाच्या विचाराशी जोडलेली आहे, असे त्यांनी सांगितले. रासायनिक शेतीमुळे उत्पादन वाढू शकते; मात्र त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांचा विचार करणेही आवश्यक आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती, मिश्र शेती आणि पशुपालक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीसाठी आवश्यक खत शेतकऱ्याला शक्य तितके स्वतःच्या शेतात आणि घरच्या साधनांतून तयार करता आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सेवाकार्यातून कृतीयुक्त काम
दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या कार्याचा उल्लेख करताना भागवत यांनी सरकारवर पूर्णपणे अवलंबून न राहता समाजाच्या विश्वासावर प्रकल्प उभे करण्याच्या कार्याचे कौतुक केले. दीनदयालजींची जयंती केवळ कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता त्यांच्या विचारांचे प्रत्यक्ष सेवाकार्यात रूपांतर करण्याचा वस्तुपाठ प्रतिष्ठानने घालून दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे स्मरण करण्यासोबतच त्यांचे कार्य प्रत्यक्ष जीवनात आणि समाजकार्यात उतरविणे महत्त्वाचे आहे. शेवटच्या माणसाचे जीवन बदलणे हाच विकासाचा खरा अर्थ आहे, असा संदेश सरसंघचालक भागवत यांनी यावेळी दिला.
कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, सचिव विजय कद्रे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी, महिला, संघ स्वयंसेवक, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
