बरेचदा नैतिकता सापेक्ष असते. एखाद्याला नैतिक वाटणारी गोष्ट दुसऱ्याला नैतिक वाटेलच, असे नाही. नैतिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. हे तत्त्व मान्य केले तरी येथील महापालिकेने लावलेला नैतिकतेचा अर्थ आपल्या गळी उतरत नाही. ‘नैतिकतेचा शंखनाद’ या नावाने पालिकेने गेल्या आठवडय़ात कस्तुरचंद पार्कावर जो धुडगूस घातला तो क्षम्य ठरावा, असा नाहीच. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करताना सत्ताधारी थोडीही तमा बाळगत नाही, याचेच दर्शन यातून झाले. पालिकेतील हे सत्ताधारी एड्सच्या जनजागृतीसाठी राखलेला निधी धर्मप्रसारासाठी खर्च करायला निघाले होते. त्यांच्या एजेंडय़ावर हिंदू हाच धर्म होता, त्यामुळे एड्सची लागण केवळ याच धर्मातील लोकांना होते की काय, असा अनेकांचा गैरसमज झाला. उच्च न्यायालयालाही हाच प्रश्न पडला. खरे तर, एड्सला केवळ हिंदू धर्माशी जोडून या सत्ताधाऱ्यांनी समस्त धर्मीयांचाच अपमान केला, पण त्यांना अडवणार कोण? कारण, हिंदू धर्माचे खरे रक्षणकर्ते आम्हीच, अशी प्रतिमा या सत्ताधाऱ्यांनीच निर्माण केलेली, त्यामुळे हे जे काही करत आहेत ते धर्माच्या उत्थानासाठीच, असा गोड समज असणारे अनेकजण होते. तरीही सामान्य नागपूरकरांनी नैतिकतेच्या या शंखनादाकडे चक्क पाठ फिरवून या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली, याबद्दल खरे तर, नागपूरकरांचे अभिनंदन करायला हवे.
गेल्या दहा वर्षांपासून येथील पालिकेत भाजपची सत्ता आहे. आता तर राज्य व केंद्रातही सत्ता आहे. याचा पुरेपूर फायदा घेत या शहराच्या विकासाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी हे सत्ताधारी झटताना दिसले असते तर अनेकांना बरे वाटले असते. ते करण्याचे सोडून या सत्ताधाऱ्यांनी हनुमानउडी घेण्याचे ठरवले आणि स्वत:चेच हसे करून घेतले. एड्स हा दुर्धर रोग आहे, यावर कुणाचे दुमत नाही. मात्र, तो टाळायचा असेल तर ब्रह्मचर्य पाळा, असे पालिका कसे काय म्हणू शकते? हनुमानाच्या ब्रह्मचर्याचा आणि एड्सचा, असा बादरायण संबंध जोडून धर्मप्रसाराचे काम करता येऊ शकते, अशी कल्पना विकासाचा एजेंडा घेऊन सत्तेत आलेल्यांना सुचते, याचाच अर्थ, यांची विकासाची संकल्पना केवळ धर्मप्रसारापुरती मर्यादित आहे, असा होतो. हे विश्लेषण या सत्ताधाऱ्यांना कदाचित मान्य असावे. आतापर्यंत राजकारणासाठी सर्व देवांची नावे वापरून झाली. एकटा हनुमानच काय तो शिल्लक उरला होता. त्यालाही राजकारणात ओढल्याबद्दल या सत्ताधाऱ्यांचे अभिनंदन करायला हवे. वैयक्तिक पातळीवर कुणी कोणत्या देवाची भक्ती करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यात कुणी नाक खुपसण्याचे कारण नाही. मात्र, सामूहिकपणे असे कार्यक्रम आयोजित करून त्यावर पालिकेच्या तिजोरीतील लाखो रुपये उधळले जात असतील तर ते आक्षेपार्ह आहे. पालिकेच्या या सत्ताधाऱ्यांपैकी एक हनुमानभक्त आहे म्हणे! त्याच्या हट्टाखातर हा चालिसाजपाचा डोलारा उभा करण्यात आला. हे जर खरे असेल तर झालेला खर्च या भक्ताच्या खिशातूनच वसूल करायला हवा. या शहरातील लोकांना पालिकेकडून कोणतीही आरोग्यसेवा मिळत नाही. पालिकेची रुग्णालये बंद पडायला आलेली आहेत. त्यात सुधारणा करण्याचे सोडून आरोग्य खात्याचा निधी अशा कार्यक्रमावर वापरला जात असेल तर ते पूर्णत: गैर व या सत्ताधाऱ्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचेच दर्शन घडवणारे आहे. धर्मप्रसार वा जागरण केले की सत्ता मिळवता येते, यावर ठाम विश्वास असलेल्या या सत्ताधाऱ्यांना ते करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या विचारसरणीचा प्रचार जरूर करावा. मात्र, त्यासाठी पालिकेचा पैसा वापरणे योग्य नाही. खरे तर, हेच मुळात अनैतिक आहे. तरीही नैतिकतेच्या गप्पा हे सत्ताधारी मारत असतील तर या सर्वाचे ‘बौद्धिक’ कमी झाले, असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.
येथील पालिकेत अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नसतात. पालिकेची आर्थिक स्थिती कायम बेताचीच राहिली आहे. अशा स्थितीत केवळ निवडणूक जवळ आहे म्हणून ही उधळपट्टी केली जात असेल तर ते समर्थनीय नाही. हे सारे सत्ताधारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भक्त आहेत. शहरातील या दोन मोठय़ा नेत्यांच्या हाती सत्तेची सूत्रे आल्यापासून सामान्य नागरिकांच्या विकासाच्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या आहेत, हे लक्षात न घेता हे सत्ताधारी असले उद्योग करतात व हे दोन्ही नेते त्यांचे कान उपटण्याच्या भानगडीत सुद्धा पडत नाहीत, हा सारा प्रकारच चीड आणणारा आहे. सामान्य लोकांना सुद्धा धर्मप्रसारात फारसा रस नाही. असता तर कस्तुरचंद पार्कवर प्रचंड गर्दी झाली असती. सामान्यांना विकास हवा आहे. जनतेचा कल नेमका कुणाकडे आहे, हे ओळखण्याचे भान जर या सत्ताधाऱ्यांना नसेल तर या पालिकेला नापासांच्या यादीतच टाकायला हवे. तशीही राजकारणात आता नैतिकता शिल्लकच राहिलेली नाही. या शब्दाची व्याख्या आपापल्या परीने करून साऱ्यांनी त्याचे वजनच कमी करून टाकले आहे. पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी तर त्याही पुढे जात हा शब्द वापरून स्वत:चे हसे करून घेतले. आता कार्यक्रम फसल्यावर हनुमानाचा जप करण्यापलीकडे व न्यायालयाच्या अवमान याचिकेकडे लक्ष देण्याशिवाय या सत्ताधाऱ्यांच्या हातात फारसे काही उरलेलेच नाही.
देवेंद्र गावंडे – devendra.gawande@expressindia.com