लोकसत्ता टीम
नागपूर : राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी ‘मान्सून’च्या हालचाली मंदावल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत पावसाची वाटचाल संथ राहील, पण त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २३-२४ ऑगस्टच्या दरम्यान मध्य भारतातील अनेक भागात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यातील हवामानात गेल्या आठवडाभरापासून मोठ्या प्रमाणात बदल होतांना दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली होती, पण पुन्हा आता हवामानात बदल होताना दिसून येणार आहेत. भारतीय हवामान खात्याने राज्यातील सहा जिल्ह्यांना “येलो अलर्ट” देण्यात आला आहे. एवढेच नाही तर काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा देखील इशारा देण्यात आला आहे. अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि वाशीमसह महाराष्ट्रातील अनेक भागात “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.
आणखी वाचा-झेंडावंदन! ‘नेत्यांनो लाभापासून तटस्थ असावे’ कुणाचा हा उपदेश?
पावसाचा जोर अनेक जिल्ह्यांत कमी झाला असला तरी काही ठिकाणी आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, नाशिक, पुणे येथे पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली होती. पण आता पाऊस परतत आहे.
राज्यात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यावेळी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. राज्यातील हिंगोली वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातील ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
आणखी वाचा-अरे बापरे! रोवनीचे काम सुरु असताना निघाला भलामोठा अजगर…
राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमी झाला. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. हवामान खात्याने पुढील चार दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला. विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही व्यक्त केली. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.