वर्धा : पावसाळा आणि आहार याचा तारतम्य ठेवण्याची सूचना नेहमी केल्या जाते. विशेषतः मांसाहारी लोकांना तर खूप सावध राहण्याचा ईशारा दिल्या जातो. त्यातही मच्छीबाबत तर अधिकच. कारण हा त्यांचा प्रजनन काळ असतो. यावेळी माश्याच्या हार्मोन्स मध्ये बदल होतो. संसर्गाचा धोका वाढतो. समुद्र खवळलेला व नद्याना पूर आलेला असतो. ताजे मासे उपलब्ध होत नाही. मासे पकडल्याने मत्स्य संवर्धन होत नाही. अंडी असलेली मच्छी खाल्ल्यास पोटाचे विकार बळावू शकतात.
मान्सून आणि नैसर्गिक बदल
मांसाहारी मासेप्रेमींसाठी हा काळ काहीसा चिंतेचा ठरतो. पावसाळ्यात अनेकदा घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा आरोग्यतज्ज्ञ विशिष्ट मासे न खाण्याचा सल्ला देतात. यामागे ठोस वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणे आहेत. बहुतांश माशांचा प्रजनन काळ (Breeding Season) सुरू असतो. सागरी जैवविविधता टिकून राहावी आणि माशांची संख्या नैसर्गिकरीत्या वाढावी, यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांसारख्या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये सरकारी पातळीवर वार्षिक मासेमारी बंदी (Fishing Ban) लागू केली जाते. खवळलेला समुद्र आणि या शासकीय बंदीमुळे ताज्या माशांची आवक पूर्णपणे थांबते. बाजारात उपलब्ध असलेले काही मासे हे ताजे नसून दीर्घकाळ ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये साठवलेले किंवा लांबच्या प्रवासाने आणलेले असतात. पावसाळ्यात आरोग्य जपण्यासाठी खालील प्रसिद्ध मासे खाणे का टाळावे, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशी सूचना तज्ञ करतात.
बांगडा – पश्चिम किनारपट्टीवर अत्यंत लोकप्रिय असलेला बांगडा मान्सूनमध्ये अंडी घालतो. मासेमारीवर बंदी असल्याने बाजारात मिळणारा बांगडा लांबच्या प्रवासाने आणलेला किंवा साठवलेला असतो. असा बांगडा खाल्ल्याने विषबाधा किंवा पोटाचे विकार होण्याचा धोका जास्त असतो.
बोंबील- महाराष्ट्रीयांचा लाडका बोंबील हा अत्यंत मऊ आणि जास्त पाण्याचे प्रमाण असलेला मासा आहे. पावसाळ्यातील अति-दमट हवामानात बोंबील अतिशय वेगाने खराब होतो. या काळात ताजे बोंबील मिळणे कठीण असल्याने संसर्ग टाळण्यासाठी बोंबील खाणे टाळणेच हितकारक ठरते.
तारली- पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेल्या तारली माशांचाही पावसाळ्यात प्रजनन काळ असतो. बाजारात ताजी तारली नं मिळाल्यास साठवलेले शिळे मासे खाण्यापेक्षा टाळले ते बरे
पापलेट (Pomfret) – मांसाहारी ताटाची शोभा वाढवणारा पापलेट पावसाळ्यात अतिशय दुर्मिळ होतो. आवक घटल्याने पापलेटच्या किमती प्रचंड वाढतात. मुख्य म्हणजे जास्त नफ्यासाठी जुना आणि साठवलेला पापलेट बाजारात विकला जाण्याचा मोठा धोका असतो.
सुरमई – सुरमई फ्राय किंवा रस्साप्रेमींना पावसाळ्यात काहीसा संयम ठेवावा लागतो. लांब पल्ल्याच्या वाहतुकीमुळे सुरमईचा ताजेपणा संपतो. संशयास्पद ताजेपणा असलेल्या सुरमईसाठी जास्त पैसे मोजणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाही.
मग कोणते मासे
पावसाळ्यात मासे पूर्णपणे बंद करण्याची मुळीच गरज नाही, असाही एक सल्ला आहे. सागरी माशांऐवजी गोड्या पाण्यातील किंवा शेतात संवर्धित केलेले (Farmed) रोहू, कतला आणि टिलीपीया (Tilapia) हे सुरक्षित आणि आरोग्यदायी पर्याय ठरतात. पण हे मासे खरेदी करतांना पण काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला सेलू तालुक्यातील बोर धरणातील मत्स्य पालक बंधू सांगतात. शहरात दुपारी ४ वाजता या माश्यांची आवक सूरू होते.
आहारातज्ज्ञ असे म्हणतात
सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या आहारातज्ज्ञ नीलम लोखंडे म्हणतात की साठवून ठेवलेले म्हणजे फ्रीझ मधील मासे किंवा बाहेर ठेवलेले मासे विषबाधा होण्याचे कारण ठरू शकतात. हवेतील दमटपणा वाढल्याने मासे लवकर खराब होतात. ताजे नसलेले मासे खाण्यात आल्यास उलट्या, जुलाब होवू शकतात. पावसाळ्यात पचनक्रिया मंदावलेली असते. दूषित मांसाहार पचायला जड जातो.
