नागपूर : जूनच्या पहिल्याच आठवड्यात प्रवेश करणाऱ्या मोसमी पावसाची गती दुसऱ्या आठवड्यात मात्र काहीशी मंदावली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यामुळे ही गती मंदावली. दरम्यान, येत्या २४ तासात मात्र विदर्भातील काही जिल्ह्यात तसेच मराठवाडा, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी ताशी ४० ते ५० किलोमीटर या गतीने वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात मोसमी पावसाची वाटचाल रखडली आहे आणि तसा अंदाज देखील हवामान खात्याने दिला होता. दरम्यान, हे मोसमी वारे ज्याठिकाणी पोहोचले त्याच ठिकाणी ते स्थिर झालेले दिसून येत आहेत. राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी दिसून येत आहे. येत्या २४ तासात यवतमाळ, चंद्रपूर, नांदेडसह लातूर, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नगर, पुणे, धुळे रत्नागिरी, नंदूरबार, रायगड आणि ठाणे, मुंबई तसेच पालघर येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे. प्रामुख्याने शनिवार आणि रविवारी पावसाचा जोर अधिक राहील.

हेही वाचा…चामुंडी कंपनी स्फोटातील बळींची संख्या आठवर, जखमी कामगाराचा मृत्यू , एकावर उपचार

दरम्यान, खासगी हवामान संस्थेने मात्र येत्या दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रासह छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश किनारपट्टीसह पश्चिम बंगालच्या काही भागात मोसमी पाऊस प्रगती करेल, असा अंदाज दिला आहे. मोसमी पावसाने पहिल्या आठवड्यात दमदार प्रगती केली. त्यानंतर मात्र मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये मोसमी पाऊस लांबण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही भागात मोसमी पावसाचे आगमन झाले, तर काही भागांमध्ये अजूनही मोसमी पावसाची प्रतीक्षा कायम आहे. येत्या काही दिवसात मोसमी पाऊस संपूर्ण विदर्भ व्यापेल, असा अंदाज आहे. यंदा मोसमी पाऊस वेळेआधीच दाखल झाला. अंदमान-निकोबारमध्ये १९ मे रोजी तर केरळमध्ये ३० मे रोजी मोसमी पावसाचे आगमन झाले. सहा जूनला कोकणात तर आठ जूनला पुण्यात मोसमी पाऊस दाखल झाला. त्यानंतर मराठवाड्यातही त्याचे आगमन झाले. नऊ जूनला मुंबई, ठाणे या भागात तर ११ आणि १२ जूनला विदर्भातील काही जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला. येत्या पाच दिवसात मोसमी पाऊस संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.