नागपुरातील ४२ प्रवाशांनी केला प्रवास

नागपूर : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महिन्याभरापूर्वी ठप्प पडलेली नागपूर जिल्ह्यातील एसटीची प्रवासी वाहतूकसेवा सोमवारी दोन बसेस नागपूर-सावनेर दरम्यान धावल्याने अखेर सुरू झाली. त्यात ४२ प्रवाशांनी प्रवास केला. पुन्हा प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने संपकत्र्यांत फूट पडल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ८ नोव्हेंबरपासून एसटीची प्रवासी वाहतूक कर्मचारी संपामुळे ठप्प पडली होती. त्यानंतर सोमवारी दोन बस नागपूर-सावनेर या मार्गावर धावल्याने प्रवाशांना आंशिक दिलासा मिळाला आहे. नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानकाहून ही बस ६ डिसेंबरला दुपारी ४.३० आणि ४.४५ वाजता धावल्या. या बस चालवण्यासाठी संपावरील चालक कामावर परतले नाहीत. परंतु विभाग नियंत्रक कार्यालयाने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत समुपदेशन करत विभागात इतर काम करणाऱ्या चालक संवर्गातील दोन कर्मचाऱ्यांना राजी केले. त्यांनी ही बस चालवल्याने अखेर नागपुरातही प्रवासी बस निघू शकली. यावेळी दोन्ही बसमध्ये नागपूर-सावनेर दरम्यान ४२ प्रवाशांनी प्रवास केला.

आंदोलकांचे मंडप आज हटण्याची शक्यता

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहराच्या विविध भागात पोलीस बंदोबस्त वाढल्याने सोमवारी   विविध आगारातील दर्शनी भागातील आंदेालकांचे मंडप एसटी प्रशासनाला हटवता आले नाही. परंतु मंगळवारी ते हटवण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने वर्तवली.

विदर्भातील सुरू आगारांची संख्या दहावर

विदर्भात रविवारी केवळ ४ आगारे सुरू झाली होती. परंतु सोमवारी सुरू आगारांची संख्या वाढून १० वर पोहचली आहे. सुरू आगारांमध्ये भंडारा विभागातील साकोली, वर्धा विभागातील आर्वी आणि हिंगणघाट, अमरावती विभागातील अमरावती, वरूड, मोर्शी, यवतमाळ विभागातील पांढरकवडा, उमरखेड, वणी, यवतमाळ या आगारांचा समावेश आहे. विदर्भातील सर्व विभागात एकूण ५९ आगारे आहेत,  हे विशेष.