अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर : राज्यातील तब्बल ६० कारागृहांत बंदिस्त असलेल्या ३८ हजार कैद्यांपैकी जवळपास ५२ टक्के कैदी तरुण आहेत. बिहार आणि उत्तरप्रदेशनंतर तरुण कैद्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.

राज्यातील सर्वच कारागृहात शिक्षाधीन कैद्यांपेक्षा न्यायालयीन बंदिवानांची संख्या (कच्चे कैदी) जवळपास सहापट आहे. यामुळे राज्यातील कारागृहात (पान ४ वर) (पान १ वरून) क्षमतेपेक्षा जास्त कैदी झाले आहेत. त्यामध्ये महिला कैद्यांचाही मोठय़ा प्रमाणात समावेश आहे. ५ हजार ८ कैद्यांना न्यायालयाने दोषी ठरवल्याने ते राज्यभरातील कारागृहात शिक्षा भोगत आहेत. ३२ हजार ५५९ कैदी न्यायालयीन बंदी आहेत. काही कच्च्या कैद्यांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे तर काहींना जामीन मिळालेला नाही म्हणून ते कारागृहात आहेत.

१ हजार ७०० महिला कैदी

राज्यभरातील कारागृहात १४० महिला शिक्षा भोगत आहेत. १२९४ तरुणी-महिला किरकोळ गुन्ह्यात न्यायाधीन बंदी आहेत. हत्याकांडाच्या कटात सहभागी असणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, देहव्यापारास प्रवृत्त करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात सर्वाधिक तरुणी-महिलांना शिक्षा झाली आहे.

राज्यातील स्थिती..

१८ ते ४० या वयोगटातील जवळपास ५२ टक्के तरुण कैदी आहेत. तरुण कैद्यांमध्ये आक्रमकता जास्त असल्यामुळे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाते. त्यांच्यात अनेकदा वाद-हाणामाऱ्या होत असल्यामुळे त्यांना काही काळ अंडासेलमध्ये ठेवण्यात येते, अशी माहिती पुणे कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयातून मिळाली.

नागपूर, मुंबईत..

नागपूर आणि मुंबई कारागृहात सर्वाधिक तरुण कैदी आहेत. दोन्ही शहरात बेरोजगारी, झोपडपट्टीबहुल वस्त्या, गुन्हेगारी प्रवृत्ती, टोळय़ा, आक्रमक जीवनशैली, व्यसनाधीनता आणि बेकायदेशीर व्यवसायाची संख्या जास्त आहे. यामुळे येथील तरुण गुन्हेगारीत ओढला जातो. गुन्हेगारी जगतात नाव कमावण्याच्या चढाओढीतून मुंबई-नागपुरात तरुणांवर गुन्हे दाखल होतात. यानंतर त्यांची रवानगी कारागृहात केली जाते.