अमरावती: मोर्शी तालुक्यातील भांबोरा गावात गुरुवारी वाघाने ५२ वर्षीय शेतकऱ्याचा बळी घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत शेतकऱ्याची ओळख चरणदास वासुदेव इखे (वय ५२, रा. भांबोरा) अशी पटली आहे. ही घटना गुरूवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इखे हे सकाळी ८ वाजता पत्नी आणि मुलासह शेतात गेले होते. पत्नी आणि मुलगा त्यांच्या स्वतःच्या शेतात काम करत असताना, इखे हे लगतच्याच भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतात कापसाच्या पिकातील तण काढण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक एका वाघाने त्यांच्यावर झडप घातली, त्यांची मान पकडली आणि त्यांना ओढत जवळच असलेल्या एका ओढ्याकडे नेले. नाश्त्यासाठी बोलावण्यास गेलेल्या मुलाला ही घटना समजली. त्याला विळ्याजवळ रक्त आणि जमिनीवर ओढत नेल्याच्या खुणा दिसल्या, त्यानंतर त्याने आरडाओरडा केला. आवाजाच्या दिशेने धाव घेतलेल्या आसपासच्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे वाघाने मृतदेह ओढ्यातच सोडला आणि झुडपांच्या दिशेने पळ काढला.

परिसरात भीतीचे वातावरण

इखे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा आणि इतर शेतकऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि मोर्शी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार सागर ढवळे, तेओसाचे आमदार राजेश वानखडे यांच्या पत्नी आरती वानखडे आणि पोलीस पाटील मीनाक्षी विनोद साबळे यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

एकाचा जीव बचावला

दरम्यान, भांबोरा येथे गुरूवारी घडलेल्या आणखी एका घटनेत २० वर्षीय तरुणाचा जीव थोडक्यात वाचला. प्रजल कुरवाळे हा सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेतात फवारणीसाठी पाणी आणण्याकरिता नदीपात्रात गेला होता. परत येत असताना त्याला मागून वाघ येत असल्याचे दिसले. त्याने नदीत उडी मारली आणि पोहत पलीकडच्या काठावर जाऊन आपला जीव वाचवला. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोर्शी परिसरात वाघाचे वारंवार दर्शन आणि पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले यांकडे दुर्लक्ष करून वन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात अपयश आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या वाघाचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.