नागपूर: बनावटी साहित्य विक्री करणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. त्यानंतरही नागपूरसह देशातील अनेक भागात ब्रांडेड कंपनीचे लेबल लावून विविध बनावटी साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे संबंधित कंपनीला मोठा आर्थिक फटका बसत असतांनाच ग्राहकांचीही बनावटी वस्तूद्वारे लुट होत आहे. नागपुरातील जरीपटका पोलीस ठाणे हद्दीतही एका घटनेमुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.

निखील इंदरलाल खानचंदानी (२५) रा. जनता रुग्णालय जवळ आणि नागपूर, सुरज साजनदास आनंदवानी (२२), प्रदीप तीरथदास ढोलवानी (४३) दोन्ही रा. हेमु काॅलनी, जरीपटका असे तिन्ही आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींची जरीपटका परिसरात जनता रुग्णालय जवळ जवाहन किराणा स्टोअर्स नावाचे प्रतिष्ठान आहे. सदर प्रतिष्ठानात आरोपी नियम धाब्यावर बसवून बनावटी गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोराईज हे डास पळवणाऱ्या द्रव्याची विक्री करत होते.

दरम्यान नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला गस्त घालतांना या प्रतिष्ठानात अनुचित प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शिताफीने या प्रतिष्ठानात छापा मारला. याप्रसंगी दुकानातील चित्र बघून पोलीसांचे पथकही थक्कच झाले. सदर प्रतिष्ठानात आरोपींकडून गोदरेज गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोराईजरचे लोगो असलेले बनावटी स्टिकर सापडले. हे स्टिकर बनावटी लिग्विडच्या बाटलीवर लावून सर्रास त्याची ब्रांडेडच्या किमतीत विक्री केली जात होती. त्यामुळे ग्राहकांकडून ब्रांडेडच्या नावाने जास्त किंमत लुटली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही पोलिसांच्या निदर्शनात आला. पोलिसांनी सदर प्रकरणात गुन्हा दाखल करत सदर प्रतिष्ठानातील २०१ नगर बनावटी डास पळवणारे द्रव्य (अंदाजे किंमत १७ हजार ८५ रुपये) जप्त केले. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर निसार तोंबोळी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नरिक्षक संदीप बुवा आणि त्यांच्या चमूने केली. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास आणखी या पद्धतीच्या अनेक बनावटी वस्तू विक्रीची प्रकरणे पुढे येण्याची शक्यताही या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

नागपूरकरांची फसवणूक…

नागपूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. रोजगार, शिक्षणासह विविध कामासाठी नागपुरात आल्यावर येथे स्थायी होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने येथील लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे नागपुरातील वाढती बाजारपेठ बघता बनावटी वस्तू विक्री करणाऱ्या टोळ्याही नागपुरात सक्रीय असल्याची शंका या क्षेत्राचीस जाणकार व्यक्त करत आहे.