Premium

गडचिरोली : ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी नेता कटकम सुदर्शनचा मृत्यू

आंध्रप्रदेशातील रहिवासी आणि नक्षलवादी चळवळीत केंद्रीय समिती व पॉलिट ब्यूरो सदस्य असलेल्या सुदर्शन कटकम उर्फ आनंद याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Naxalite leader Katkam Sudarshan dies
नक्षलवादी नेता कटकम सुदर्शनचा मृत्यू

गडचिरोली : तत्कालीन आंध्रप्रदेशातील रहिवासी आणि नक्षलवादी चळवळीत केंद्रीय समिती व पॉलिट ब्यूरो सदस्य असलेल्या सुदर्शन कटकम उर्फ आनंद याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो ६९ वर्षाचा होता. त्याच्यावर शासनाने ८० लाखांचे बक्षीस ठेवले होते. मागील कित्येक  वर्षांपासून तो पोलिसांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ होता. यासंदर्भात नक्षलवाद्यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील बेल्लमपल्ली गावात जन्मलेल्या सुदर्शन याने खाणकाम अभ्यासक्रमात शिक्षण घेतले होते. १९७८ मध्ये तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय झाला. सुरवातीला आदिलाबाद जिल्हा सचिव म्हणून कार्यरत सुदर्शनने १९८५ मध्ये दंडकारण्यात प्रेवश केला. त्याच्याकडे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा पथकाचे नेतृत्व सोपवण्यात आले. दंडकारण्यात पाठविण्यात आलेल्या सात पथकापैकी ते एक होते. पुढे याचा विस्तार छातीसागड राज्यातील बस्तरपर्यंत झाला. त्याने आदिलाबाद,गडचिरोली,बस्तर ते पूर्व गोदावरीपर्यंत विस्तारित ‘रिट्रीट झोन’ तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

हेही वाचा >>> चंद्रपूर : केंद्र सरकारची स्तुती करताना बेरोजगारी, काळेधन व महागाईवर मात्र माजी मंत्री अहीरांचे मौन!

तो सीपीआय-एमएल पीपल्स वॉरच्या ‘वन संपर्क समिती’ सदस्य होता. १९९५ मध्ये त्याची नव्याने स्थापन झालेल्या ‘उत्तर तेलंगणा स्पेशल झोनल कमिटी’च्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनतर ‘ऑल इंडिया स्पेशल कॉन्फरन्स’मध्ये केंद्रीय समितीवर निवड, तसेच २००१ आणि २००७ त्यांची केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरो सदस्य म्हणून निवड झाली. तो नक्षलवादी चळवळीत ‘कॉम्रेड आनंद’ म्हणून प्रसिद्ध होता. पोलिसांसोबत झालेल्या अनेक चकमकीत तो बचावला होता. नक्षल चळवळीला मोठे करण्यात त्याची महत्वाची भूमिका होती. माध्यमांसोबत संवाद साधण्याची पद्धत सुध्दा त्यानेच सुरू केली. मागील काही वर्षांपासून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या आजारांनी ग्रासले होते. अखेर ३१ मे रोजी त्याचा छत्तीसगडच्या जंगलात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नक्षलवाद्यांनी रविवारी यासंदर्भात पत्रक काढून माहिती दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 10:42 IST
Next Story
चंद्रपूर : केंद्र सरकारची स्तुती करताना बेरोजगारी, काळेधन व महागाईवर मात्र माजी मंत्री अहीरांचे मौन!