गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै) जवळील वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाली. मोलमजुरी करून कसेबसे आयुष्य जगणाऱ्या गावातील सहा महिलांवर एकाच दिवशी काळाने झडप घातल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. यात नाव उलटल्यानंतर खडकाचा आधार घेत बचावलेल्या सासूने डोळ्यापुढे बुडणाऱ्या सुनेला हात दिला आणि दोघीही बुडाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गणपूर (रै) गावातील महिला मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील टोक या गावी मिरची तोडण्यासाठी जातात. मंगळवारीदेखील या महिला नेहमीप्रमाणे वैनगंगा नदीपात्रातून दोन नावेने निघाल्या होत्या. परंतु आदल्या रात्री चिचडोह प्रकल्पातून कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला होता. यापासून अनभिज्ञ असलेल्या नावाड्याला अंदाज न आल्याने नाव नदीच्या मधोमध गेल्यावर उलटली. दोन नावेतील एकूण सोळा महिला बुडाल्या. यातील एक नाव ज्या ठिकाणी बुडाली त्याठिकाणी खडक जवळ असल्याने त्यातील आठ जण बचावले. परंतु दुसऱ्या नवेतील आठपैकी दोघे बचावले तर जिजाबाई दादाजी राऊत (५५), पुष्पा मुक्तेश्वर झाडे (४२), रेवंता हरिश्चंद्र झाडे (४२), मायाबाई अशोक राऊत (४५), सुषमा सचिन राऊत (२५), बुधाबाई देवाजी राऊत (६५, सर्व रा.गणपूर(रै.) या सहा महिला बुडाल्या. यातील दोघींचे मृतदेह आढळून आले. इतरांचा शोध सुरू आहे. यात बुडालेल्या मायाबाई राऊत नाव उलटताच खडकाचा आधार घेत बचावल्या होत्या. परंतु डोळ्यापुढे सून सुषमा राऊत बुडत असताना मायाबाईने तिला वाचवण्यासाठी हात पुढे केला. पण प्रवाह अधिक असल्याने मायबाईदेखील सुनेसोबत वाहून गेल्या. जलसमाधी मिळालेल्या महिलांमधील पाच महिला पहिल्यांदाच मजुरीसाठी निघाल्या होत्या आणि घात झाला. असे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा – बुलढाणा जिल्हा हादरला! वयोवृद्ध सासऱ्याने केली गर्भवती सून व नातवाची निर्घृण हत्या; मारेकऱ्याला अटक

हेही वाचा – संमेलनाच्या मंचावर आठ मंत्र्यांची मांदियाळी! राजकीय प्रभाव कमी करण्यात महामंडळही अपयशीं

चिचडोह प्रशासनाविरोधात संताप

दुर्घटनेनंतर पोलिसांकडून शोधमोहीम राबविल्या जात आहे. दरम्यान, नदीपात्रात प्रत्यक्ष जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी चिचडोह प्रकल्पातून कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले. यामुळे रात्रभरात पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे नाविकाला पाण्याचा अंदाज आला नाही. अशाप्रकारे पाणी सोडताना धरण प्रशासनाकडून पूर्वसूचना देण्यात येते. परंतु मंगळवारी तसे घडले नाही आणि घात झाला. याला दोषी चिचडोह प्रकल्पातील अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother in law and daughter in law drowned gadchiroli district is expressing grief due to the ganpur boat tragedy ssp 89 ssb
First published on: 24-01-2024 at 11:07 IST