संरक्षण क्षेत्राशी संबंधितांकडून आठवणींना उजाळा

नागपूर : संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नागपूर शहरात शोककळा पसरली. त्यांच्या नागपूरभेटीच्या आवठणींना या क्षेत्राशी संबंधित नागरिकांनी उजाळा दिला.

जनरल बिपीन रावत हे देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख होते. त्यामुळे सशस्त्र निर्मिती पासून ते हवाई दल, सैन्यदल आणि नौसेना यांच्या सुसज्जतेच्या आढावा घेण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ते करीत होते. याच मालिकेत ते अलीकडे नागपूर भेटीवर आले होते. केवळ तीन आठवडय़ापूर्वीची त्यांची हवाई दलाच्या मेंटनन्स कमांड आणि सोलर इंडस्ट्रीज युनिटला दिलेली भेट  अखरेची ठरली. १५ नोव्हेबरला ते नागपूर भेटीवर आले होते. त्यांनी वायुदलाच्या नागपुरातील मेंटनन्स कमांडला भेट दिली होती. यावेळी मेंटनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्यांनी यावेळी मेंटनन्स कमांडच्या तयारीचा आढावा घेतला होता. यानंतर कोंढाळीजवळील सोलार एनर्जीच्या आयुध शस्त्रनिर्मिती कारखान्याला भेट दिली होती. ते सोनेगाव एअरफोर्स स्टेशन येथून हेलिकॉप्टरने सोलर इंडस्ट्रीजच्या युनिटला गेले होते. तत्पूर्वी ते भारतीय लष्कराचे प्रमुख असताना त्यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. जनरल पदावरील व्यक्तीने खासगी सैनिक शाळेच्या वार्षिक कार्यक्रमाला दिलेली ती पहिली भेट होती, असे सांगण्यात येते.

सशस्त्रयुक्त ड्रोन

जनरल बिपीन रावत यांच्यासमोर नागपुरात सशस्त्रयुक्त ड्रोन आणि युद्धसामग्रीचे प्रात्यक्षिक करण्यात आले होते. सोलर इंडस्ट्रीज ही स्वदेशी सशस्त्रयुक्त ड्रोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. या कंपनीला भारतीय संरक्षण दलाने हॉतबॉम्ब बनवण्याचे मोठे कंत्राट दिले आहे. जनरल रावत यांनी तीन प्रकारचे ड्रोनचे प्रात्यक्षिक पाहिले. हे ड्रोन भारतीय लष्करात वापरण्यात येणार आहेत.