गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील चटका लावून जाणाऱ्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्य शासनाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तीन दिवसांचा अधिकृत शासकीय दुखवटा जाहीर केला असून सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, गडचिरोली नगरपालिकेत या दुखवट्याचे भान हरपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अवघ्या राज्यावर शोककळा पसरलेली असताना नगरपालिका सभापती अनिल कुनघाडकर यांनी आज आपल्या बांधकाम सभापतीपदाचा पदग्रहण सोहळा पार पाडला. सत्ताधाऱ्यांच्या या ‘खुर्चीप्रेमा’वर संताप व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांनी थेट सभापतींच्या कक्षात जाऊन या प्रकाराचा जाहीर निषेध केला.

विशेष म्हणजे, आज नगरपालिका सभागृहात एकीकडे दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्याच वेळी दुसरीकडे नवनिर्वाचित सभापती अनिल कुनघाडकर यांचा पदग्रहण सोहळाही पार पडला. एकाच छताखाली शोकसभा आणि सोहळा असे परस्परविरोधी चित्र पाहायला मिळाले. या दोन्ही कार्यक्रमांची अधिकृत माहिती नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांना देण्यात आली नव्हती. काही वैयक्तिक कामानिमित्त टेंभुर्णे नगरपालिकेत आले असता, त्यांना या पदग्रहण सोहळ्याची माहिती मिळाली.

शासकीय दुखवटा सुरू असताना असा आनंदोत्सव साजरा होत असल्याचे पाहून टेंभुर्णे यांनी थेट सभापतींचे कार्यालय गाठले. उपस्थित पदाधिकारी आणि समर्थकांसमोरच त्यांनी सभापती कुनघाडकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर झालेला असताना पदग्रहणासारखे कार्यक्रम आयोजित करणे हे सत्ताधारी पक्षाला आणि महायुती सरकारमधील पदाधिकाऱ्यांना अशोभनीय आहे. केवळ खुर्चीच्या हव्यासापोटी नियमांचे आणि नैतिकतेचे उल्लंघन केले जात आहे, अशा शब्दांत टेंभुर्णे यांनी आपला संताप व्यक्त केला.

विनाकारण राजकारण करू नये

कुठलाही पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आलेला नव्हता. मी नेहमीप्रमाणे माझ्या खुर्चीवर बसलेलो होतो. विरोधकांनी विनाकारण राजकारण करू नये, असे गडचिरोली नगरपालिका बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांनी म्हटले आहे.

पदग्रहण सोहळा घेणे अशोभनीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. असे असताना महायुतीतील नेत्यांनी पदग्रहण सोहळा घेणे अशोभनीय आहे, अशी टीका गडचिरोली नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते सतीश विधाते यांनी केली.